जळगाव - मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे मानसिक धक्का बसल्याने आईचा देखील मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर येथे बुधवारी ही हृदयद्रावक घटना घडली. मंगला भास्कर महाले (वय ५५, रा. फैजपूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर मानसिक धक्क्याने आईचा मृत्यू - Woman dies of trauma
फैजपूर येथील तरुणाचा 20 एप्रिलला सायंकाळी फैजपूर येथून अमळनेरकडे जाताना मृत्यू झाला होता. यामुळे मुलाचा अपघातील मृत्यू झाल्याचा मानसिक धक्का बसल्याने त्याच्या आईचा खासगी रुग्णालयाच मृत्यू झाला.
फैजपूर येथील विद्यानगरातील रहिवासी असलेल्या भास्कर महाले यांचा मुलगा सुधीर महाले हा 20 एप्रिलला सायंकाळी फैजपूर येथून अमळनेरला पत्नीला आणण्यासाठी कारने जात होता. चोपडा तालुक्यातील धानोरा गावाजवळ त्याच्या कारचा अपघात झाला. त्यात सुधीरचा मृत्यू झाला होता. मंगळवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने आई मंगला महाले यांना जबर मानसिक धक्का बसला होता. त्यात प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने सावदा येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या अपघाती मृत्यूच्या धक्क्यातून त्या सावरल्या नाहीत.
या घटनेमुळे महाले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या दोन दिवसातच घरातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मंगला महाले यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.