जळगाव - जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पाल परिसरात सुकी नदीच्या पात्रात अतिप्राचीन मानला जाणारा 'कॉलमनार बेसाल्ट' खडक आढळला आहे. हा खडक 'दगडी खांब' म्हणूनही ओळखला जातो. ६ कोटी वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्रचंड ज्वालामुखी उद्रेक झाला. त्यातून बाहेर पडलेल्या लाव्हारसातून कॉलमनार बेसाल्ट खडकाची निर्मिती झाली असावी, असा भूशास्त्र संशोधकांचा अंदाज आहे.
माहिती देतांना प्राध्यापक सुरेश चोपणे 'कॉलमनार बेसाल्ट' हा खडक अत्यंत दुर्मिळ नैसर्गिक खडक मानला जातो. चंद्रपूर येथील भूशास्त्र संशोधक प्राध्यापक सुरेश चोपणे हे गेल्या आठवड्यात अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने जळगावात आलेले होते. या दौऱ्यात पाल परिसरात फिरताना त्यांना हे खडक आढळले. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर जमिनीवर आलेला लाव्हारस अचानक पाण्याच्या संपर्कात येऊन थंड झाला असावा, त्यानंतर तो आकुंचन पावून षटकोनी आकाराचे खांब तयार झाले असावेत, असा अंदाज प्राध्यापक चोपणे यांनी वर्तवला आहे. सुरेश चोपणे यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जीवाश्म आणि भौगोलिक संशोधन केले असून, त्यांचे आपल्या घरी स्वतःचे अश्म संग्रहालय आहे. १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान ते जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात अभ्यासासाठी आले होते. यावेळेस त्यांनी पाल, जामन्या, करंजपाणी, गटऱ्या, लंगडाआंबा, वाकी, टायगर कुटी, गारखेडा आणि शिरवेल परिसरात निरीक्षणे केली. त्यांच्या सोबत जळगावातील वन्यजीव अभ्यासक रवी फालक आणि नितीन जोशी हे देखील होते.
अशी झाली सातपुडा पर्वतरांगेची निर्मिती
जळगाव जिल्ह्यातील परिसर हा भौगोलिकदृष्ट्या अतिप्राचीन आहे. सुमारे ६ कोटी वर्षांपूर्वी उत्तर क्रिटाशिअस (late cretaceous) काळात पृथ्वीवर भौगोलिक घडामोडी घडल्या आणि आजच्या पश्चिम घाटातून भेगी उद्रेकाद्वारे तप्त लाव्हारस जळगाव जिल्हा आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत वाहत आला. या उद्रेकातून तयार झालेल्या दगडी थरांना डेक्कन ट्राप (Deccan Trap) नावाने ओळखले जाते. हा ज्वालामुखी परिसर मध्य भारतात ५ लाख स्क्वेअर किलोमीटर परिसरात आणि पश्चिमेकडे ६६०० फुट जाडीचा आहे. महाराष्ट्रात ८० टक्के हा भूभाग हा याच बेसाल्ट अग्निजन्य खडकापासून बनला आहे. पुढे जवळजवळ ४ कोटी वर्षादरम्यान भूभागाच्या अंतर्गत टक्करीमुळे जमीन उंच होत गेली आणि त्यातून सातपुडा पर्वतरांग तयार झाली, असेही प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात 'या' ठिकाणीही आढळतात कॉलमनार बेसाल्ट खडक
कर्नाटकात सेंट मेरी बेट हे अशाच कॉलमनार बेसाल्टसाठी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात मुंबई, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ येथे हे खडक आढळले असून, त्यात आता जळगाव जिल्ह्याचेही नाव समाविष्ट झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात बेसाल्ट खडकाची जाडी जास्त असून, विदर्भात या खडकाची जाडी कमी आहे. त्यामुळे गेल्या हजारो वर्षांपासून भूक्षरण होऊन प्राचीन खडक उघडे पडत आहेत. त्यामुळे अनेक नव्या जीवाश्मांचे संशोधन होऊ शकेल. जळगाव परिसरात त्या काळात तप्त लाव्हारस वाहत आला. तेव्हा येथील नद्यांमध्ये तो पडून अचानक थंड झाला. त्यामुळे आकुंचन पावून त्याने षटकोनी आकार घेतला आणि असे दगडी खांब तयार झाले. त्यांना कॉलमनार बेसाल्ट असे म्हणतात. इतर ठिकाणी तशी स्थिती नसल्याने तेथे ते होऊ शकले नाही. अनेक ठिकाणी षटकोनी खांबांऐवजी पंच किंवा सप्तकोनी खांब सुद्धा आढळतात. हे खांब मानवाने ऐतिहासिक काळात मंदिरांच्या बांधकामासाठी वापरले आहेत, असा दावाही प्रा. चोपणे यांनी केला आहे.
हेही वाचा -अण्णा हजारेंनी तुकाराम मुंढेंसारखं न घाबरता काम करण्याचा सल्ला दिला - तहसीलदार ज्योती देवरे