जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. रविवारी पुन्हा 63 रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 83 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात जळगाव शहरासह भुसावळ, अमळनेर, यावल तसेच रावेरात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत.
जिल्हा प्रशासनाला रविवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये तब्बल 63 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात अमळनेर 15, जळगाव शहरात 12 आणि भुसावळ शहरात 10 रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे, चोपडा 1, धरणगाव 2, यावल 8, एरंडोल 4, जामनेर 3, रावेर 4, चाळीसगाव 2, बोदवड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्याखेरीज दुसऱ्या जिल्ह्याशी निगडित एक रुग्णदेखील रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात पॉझिटिव्ह म्हणून समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्वच 15 तालुक्यांमध्ये आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संपूर्ण जिल्हाच कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. आतापर्यंत बोदवड तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. परंतु, रविवारी येथेही कोरोनाचा रुग्ण आढळला. बोदवडमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून, त्याच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्याच्या हालचाली आरोग्य यंत्रणेकडून सुरू झाल्या आहेत.