जळगाव- जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक हा जळगाव शहर महापालिकेच्या हद्दीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी दिवसभरात एकट्या जळगाव शहरात कोरोनाचे 37 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या पाचशेच्या पुढे गेली. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी 106 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 589 इतकी झाली आहे.
जिल्हा प्रशासनाला मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 106 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 37, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 4, अमळनेर 4, चोपडा 4, पाचोरा 1, धरणगाव 3, यावल 8, एरंडोल 15, जामनेर 3, रावेर 5, पारोळा 17 तर इतर जिल्ह्यातील 2 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 15 पैकी 10 तालुक्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. त्यातल्या त्यात जळगाव शहर, भुसावळ, अमळनेर, चोपडा, रावेर आणि पारोळा याठिकाणी परिस्थिती अधिक गंभीर आहे. जळगाव शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाचशेच्या पुढे आहे. तर, भुसावळात चारशे, अमळनेरात तीनशे तसेच चोपडा, रावेर आणि पारोळ्यात दोनशेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.