महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'थर्टी फर्स्ट'साठी जिल्ह्यात 578 पोलीस असणार रस्त्यावर - थर्डी फर्स्ट बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी 'थर्टी फर्स्ट'साठी शासनाने अटी घालून दिल्या आहेत. या अटींची अंमलबजावणी होते की नाही, यासाठी जळगाव जिल्ह्यात थर्टीफर्स्टच्या रात्री 578 पोलीस विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी असणार आहेत.

डॉ. प्रवीण मुंढे
डॉ. प्रवीण मुंढे

By

Published : Dec 30, 2020, 7:27 PM IST

जळगाव -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी 'थर्टी फर्स्ट'साठी शासनाने अटी घालून दिल्या आहेत. या अटींचे पालन करुनच नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे. नियमांची अंमलबजावणी होते की नाही, हे बघण्यासाठी जळगाव जिल्ह्यात थर्टीफर्स्टच्या रात्री 578 पोलीस रस्त्यावर असणार आहेत. सर्व हॉटेल्स, बियरबार यांना रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यातच रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार असल्याची माहितीही पोलीस दलाने दिली आहे.

माहिती देताना पोलीस अधीक्षक

मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच थांबून नव्या वर्षाचे स्वागत साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे. नागरिकांनी बागेत, रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्याने येऊन गर्दी न करता मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. 60 वर्षांवरील नागरिक व 10 वर्षांखालील मुलांनी घराबाहेर निघणे टाळावे. कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, फटाक्यांची आतषबाजी, मिरवणूकीस पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक ठिकाणा जाणाऱ्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू आहे. 31 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजेनंतर कोणताही कार्यक्रम, दुकाने, बियरबार, हॉटेल्स सुरु ठेवता येणार नाहीत. मद्य पिऊन रस्त्यावर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशा सूचना डॉ. मुंढे यांनी दिल्या आहेत.

ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईसाठी 35 पथके

31 डिसेंबरला संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख रस्ते, चौकांमध्ये पोलिसांची गस्त राहणार आहे. यात 93 अधिकारी व 627 कर्मचारी, असे एकूण 578 पोलीस गस्त घालणार आहेत. यात 58 नाकाबंदी पॉईंट, 126 फिक्स पॉईंट, 45 पेट्राेलिंग पथक व ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यासाठी 35 पथके नेमण्यात आली आहेत.

मद्यपी वाहनधारकांवर कारवाई होणार

थर्टीफर्स्टच्या दिवशी दिवसभर व रात्री देखील मद्यप्राशन करुन वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. यासाठी चौकाचौकात पोलीस बंदोबस्त राहणार आहे. तसेच रस्त्यावर देखील पोलिसांची गस्त राहणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी मद्यप्राशन करुन वाहने चालवू नये, असे आवाहन देखील पोलीस दलाकडून करण्यात आले आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

हेही वाचा -एकनाथ खडसेंची १४ दिवसानंतर होणार 'ईडी'कडून चौकशी

हेही वाचा -जळगाव: पॅसेंजर रेल्वे बंद राहिल्याने सामान्यांच्या खिशाला झळ

ABOUT THE AUTHOR

...view details