महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेस-राष्ट्रवादीचे ५० पेक्षा अधिक आमदार आमच्या संपर्कात; गिरीश महाजन यांचा दावा - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

विरोधी पक्षातील १०० टक्के आमदार भाजपमध्ये प्रवेशासाठी आग्रही आहेत. मात्र, युती असल्याने आम्ही सगळ्यांना सामावून घेऊ शकत नाही. कोणाला पक्षात घेतले तरच निवडून येऊ, अशी परिस्थिती आता भाजपची राहिलेली नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

गिरीश महाजन

By

Published : Aug 6, 2019, 3:32 AM IST

Updated : Aug 6, 2019, 7:27 AM IST

जळगाव- आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ८३ पैकी १५ ते २० आमदार आपल्या पक्षांमध्ये राहायला तयार नाहीत. सद्यास्थितीत या दोन्ही पक्षातील तब्बल ५० पेक्षा अधिक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महाजनादेश' यात्रा ७ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांची जामनेर, जळगाव, भुसावळ येथे जाहीर सभा होणार असून, त्याची पूर्वतयारी सुरू असल्याचे महाजन यांनी सांगितले. यावेळी भाजपच्या मेगा भरतीविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले की, विरोधी पक्षातील १०० टक्के आमदार भाजपमध्ये प्रवेशासाठी आग्रही आहेत. मात्र, युती असल्याने आम्ही सगळ्यांना सामावून घेऊ शकत नाही. कोणाला पक्षात घेतले तरच निवडून येऊ, अशी देखील परिस्थिती आता भाजपची राहिलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री गुलाबराव देवकर मला दोन वेळा भेटले. विधानपरिषदेचे माजी आमदार मनीष जैन देखील मला भेटून गेले आहेत. धुळ्याचे आमदार कुणाल पाटील हे तर मला पक्षात घ्या म्हणून मागे लागलेले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांना स्वतःच्या मतदारसंघात १ लाखाहून अधिक मतांची पिछाडी होती. त्यांना मी लोकसभेवेळीच भाजपमध्ये येण्यास सांगितले होते. पण त्यांनी तेव्हा ऐकले नाही. आता त्यांना घेणे शक्य नाही. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात येणाऱ्या महाजनादेश यात्रेत कोण कोण भाजपवासी होईल? याचे चित्र स्पष्ट होईल, असे महाजन यांनी सांगितले.

विरोधी पक्ष उरतो की नाही, याची आम्हालाही चिंता

सद्यास्थिती पाहता युतीला आगामी विधानसभा निवडणुकीत २४० पेक्षा अधिक जागा मिळतील. विरोधी पक्ष उरतो की नाही, याची आम्हाला देखील चिंता लागली आहे. विरोधी पक्ष असला पाहिजे, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना भाजपमध्ये घेणार नाही. आपल्याकडे लोकशाही आहे. या लोकशाहीत सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष असलाच पाहिजे. पण, जे उरतील त्यांच्यापैकी किती निवडून येतील, यात शंकाच आहे, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.

स्वातंत्र्यानंतर देशासाठी पहिल्यांदाच झाला अभूतपूर्व निर्णय

काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० आणि कलम ३५ (अ) रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय भाजप सरकारने घेतला आहे. स्वातंत्र्यानंतर देशासाठी पहिल्यांदाच असा अभूतपूर्व निर्णय झाला आहे. काश्मीर हे भारताचे मुकुट आहे. या मुकुटाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या वाघांच्या हातून झाले असल्याची प्रतिक्रिया, गिरीश महाजन यांनी यावेळी बोलताना दिली. काश्मीरबाबतच्या काही आठवणी देखील त्यांनी सांगितल्या.

देवेंद्र फडणवीस सक्षम मुख्यमंत्री, मला मुख्यमंत्री व्हायची गरज नाही

देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सक्षम मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभलेले असताना मला मुख्यमंत्री व्हायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांचे काम उत्तमरीत्या सुरू आहे. पक्षाने त्यांना अजून एक संधी दिली पाहिजे अशी अपेक्षा, गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री पदाशी त्यांचे नाव जोडले जात असल्याने महाजन यांनी अधिकृतरित्या त्यावर खुलासा केला. आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. टीम वर्क पद्धतीने आमचे चांगले काम सुरू आहे. आमच्यात पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय अंतिम असतो. पक्षाने मला मुख्यमंत्री नाही, पण पुन्हा एकदा मंत्री केले पाहिजे. मी मंत्री झालो तर मला खूप आनंद होईल, असेही महाजन यावेळी म्हणाले.

Last Updated : Aug 6, 2019, 7:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details