जळगाव - बोदवड तालुक्यातील सुरवाडे खुर्द परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सुरवाडे पंचक्रोशीसह तालुक्यातील 200 ते 250 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद-मूग या पिकांसह शेतांचे बांध देखील पाण्यासोबत वाहून गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात सोमवारी रात्री पाऊस पडला. त्यात बोदवड तालुक्यातही ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सुरवाडे खुर्द परिसरात रात्री 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे अनेकांच्या शेतातील अंकुरलेली पिके वाहून गेली. काही ठिकाणी कापसाच्या शेतातील ठिबक सिंचन संच देखील वाहून गेले आहेत. पावसाने केलेल्या नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. शासनाकडून आम्हाला त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.