जळगाव -सत्ता ही लोकांच्या सुरक्षेसाठी असली पाहिजे, दुराचारासाठी नाही. पण भाजपाने ज्या पद्धतीने देशात दुराचार माजवला आहे. त्या विरोधात आज सामान्य जनता तसेच काँग्रेसजन अशा सर्वांच्या मनात आग पेटली आहे. उद्या ही आग बाहेर आली तर भाजपाला जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही. केंद्रातले मोदी सरकार हे इंग्रजांपेक्षाही अत्याचारी आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आज भाजपवर केली. पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी नाना पटोले हे आज (बुधवारी) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. जिल्ह्यातील फैजपूर येथे नवीन कृषी कायद्यांची होळी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आदींची उपस्थिती होती.
माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केंद्राच्या दुर्लक्षामुळे उसळली कोरोनाची दुसरी लाट -
नाना पटोले पुढे म्हणाले, केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने कोरोनाची दुसरी लाट उसळली. त्यात अनेकांचे जीव गेले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला राज्य सरकारने सक्षमपणे तोंड दिले. सामूहिक प्रयत्नांमुळे दुसरी लाट ओसरली. आता तरी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या अत्याचारी सरकारची 5 वर्षे संपण्याची वाट जनता पाहतेय -
केंद्रातील अत्याचारी मोदी सरकारने जे कृषी विषयक तीन काळे आणले, त्या कायद्यांचे दहन करण्यासाठी मी फैजपुरात आलो आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शेतकरी या कायद्यांना विरोध करत आहेत. फैजपूर ही पावन भूमी आहे. याच भूमीतून काँग्रेसने त्या काळात इंग्रजांच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी 50वे अधिवेशन घेतले होते. त्याची प्रतिकृती म्हणून आज केंद्रात जे भाजपचे सरकार आहे, ते इंग्रजांपेक्षाही अत्याचारी आहे. त्यांनी आणलेल्या कायद्यांचे आज दहन केले आहे. पाशवी बहुमताच्या आधारावर मोदी सरकार देशाची आर्थिक व्यवस्था, शेतकरी, बेरोजगार आणि गरिबांना संपवण्याचे काम करत आहे. हे लोक बघत आहेत. या अत्याचारी सरकारची 5 वर्षे संपण्याची वाट देशातील जनता पाहत आहे. 2024मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला.
नाना पटोले आदिवासी बांधवांसोबत नृत्यात झाले सहभागी हेही वाचा -संजय राऊत यांच्या विरोधात महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी करा; उच्च न्यायालयाचे निर्देश
...तेव्हा मोदी निवडणूक प्रचारात रमले होते -
काँग्रेसच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात सातत्याने आंदोलने केली जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी एसओपी आहे, ती पाळणे गरजेचे आहे. याच कारणामुळे केंद्र सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करता येत नाही. मात्र, देशात मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट उसळलेली होती. सगळीकडे चिता पेटत होत्या. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचारात रमले होते. मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जात होती. देशाला बरबाद करण्याची ही सगळी दुरवस्था भाजप सरकारने निर्माण केली आहे. त्याविरोधात काँग्रेस लोकसभेत असेल, रस्त्यावर असेल लोकांच्या हितासाठी लढाई लढत आहे, असेही त्यांनी सांगितले.
आता रिव्हर्स होण्याचा प्रश्नच नाही -
स्वबळाचा संदेश आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहचला असून, ते कामाला लागले आहेत. परंतु, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत स्वबळाचा नारा आम्ही दिला आहे, त्यात आता रिव्हर्स होण्याचा प्रश्न नाही, असे सांगत नाना पटोले यांनी, कोरोनाची बिकट परिस्थिती, वाढती महागाई व बेरोजगारी असताना केंद्र सरकार झोपले आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेविरोधात आवाज उचलण्याचे काम काँग्रेस करत असल्याचेही पटोले म्हणाले.
हे तर फडणवीस सरकारचे पाप -
2017 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक लागली होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाला तुडवून एका परिपत्रकाच्या आधारे नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक ओबीसीच्या रोस्टरच्या नावाने पुढे ढकलली. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना मुदतवाढ मिळाली. त्यावेळी काही जण उच्च न्यायालयात गेले. तेव्हा न्यायालयाने ओबीसी आयोग नेमून जनगणना करावी. त्यानुसार आरक्षण देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. दोन वर्षे आधी हा निर्णय दिला होता. पण फडणवीस सरकारने आयोग नेमला नाही. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. नंतर पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या. तेव्हा आरक्षणासाठी काही जण सर्वोच्च न्यायालयात गेले. तेव्हा हा निर्णय आला. ओबीसी आरक्षण रद्द होण्याचे जे पाप फडणवीस सरकारने केले, त्याचे परिणाम फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या ओबीसी समाजावर झाले, असेही पटोले यांनी केले.
हेही वाचा -... म्हणून गॅंग प्रमुखाच्या नादाला लागू नका'; गुलाबराव पाटलांचा मुनगंटीवारांना टोला
कोणतीही आघाडी काँग्रेस शिवाय होऊच शकत नाही -
भाजपच्या विरोधात कोणत्याही प्रकारची आघाडी काँग्रेस शिवाय होऊच शकत नाही. काँग्रेस पक्ष हा युपीएचे हृदय आहे. जर कोणताही विरोधी पक्ष तिसरा मोर्चा काढायला गेला तर त्याचा सरळ फायदा भाजपला होईल, हे आता सर्वांना कळले आहे. त्यामुळे काँग्रेसला सोडून अशी तिसरी आघाडी होणार नाही, असे मला वाटते. दरम्यान, अधिवेशनाचा कालावधी किती असावा, किती नसावा, हे अॅडव्हायझर कमिटीत फायनल होतो. तिथे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असतात. त्यानंतर विरोधक बाहेर येऊन अधिवेशनाच्या कालावधीबाबत ओरडत असतील तर तिथे हे का शांत बसले? महाराष्ट्राच्या राजकीय प्रथा आणि परंपरा पायदळी तुडवण्याचे काम भाजप करत आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
मागच्या सरकारमध्येही नळावरचे भांडण होतेच की -
स्वबळाचा नारा यात काही नावीन्य नाही. मागच्या युतीच्या सरकारच्या काळातही नळावरचे भांडण होते. स्वबळाचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. याच्यावर खूप चर्चा करण्यासारखे काही नाही. आज काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात दोन हात करेल, असेही पटोले यांनी सांगितले.
पटोलेंनी धरला ठेका -
यावेळी नाना पटोले यांनी प्रेरणा स्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील घटना व घडामोडींच्या छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी पटोले यांनी आदिवासी बांधवांसोबत नृत्य केले. ढोल वाजवण्याचाही त्यांनी आनंद घेतला.