जळगाव-तीन वर्षांपूर्वी कामावर गैरहजर राहिल्याच्या कारणावरुन बडतर्फ झालेल्या एका महापालिका कर्मचाऱ्याचा आज सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला. महापालिका प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने बडतर्फ केल्याने अन्याय झाल्याचा आरोप करीत मृत कर्मचाऱ्याच्या संतप्त कुटुंबीयांनी मृतदेह महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात आणत ठिय्या मांडला होता. यावेळी कुटुंबीयांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. तसेच मयत कर्मचाऱ्यावर केलेली कारवाई रद्द करीत अनुकंपासह निवृत्तीवेतनाचे लाभ देण्याची मागणीही केली. या प्रकारामुळे महापालिकेत काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.
बडतर्फ कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांचा आयुक्तांसमोर आक्रोश; मृतदेह आणला महापालिकेत - जळगाव मनपा बातमी
एकदिवस कामावर गैरहजर राहिल्याच्या कारणावरुन बडतर्फ झालेल्या महापालिका कर्मचाऱ्याचा आज सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला. चुकीच्या पद्धतीने बडतर्फ केल्याने अन्याय झाल्याचा आरोप करीत मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात आणत ठिय्या मांडला.
विष्णू चावदस बागडे (५५) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. विष्णू बागडे हे महापालिकेत बांधकाम विभागात मजूर म्हणून कार्यरत होते. त्यांची शहरातील शिवाजी पुतळा येथे नेमणूक होती. कामावर गैरहजर राहिल्याने त्यांना ऑक्टोबर २०१७ मध्ये महापालिकेचे तत्कालीन आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांनी बडतर्फ केले होते. कामावर केवळ एक दिवस गैरहजर राहिले म्हणून बडतर्फ करणे ही अन्यायकारक कारवाई असल्याचा आरोप बागडे परिवाराने केला होता. महापालिकेच्या बडतर्फीच्या आदेशाविरुद्ध मयत विष्णू बागडे कोर्टात देखील गेले होते. बडतर्फीचे आदेश रद्द करण्यासाठी प्रशासनाविरुद्ध लढत असतानाच गुरुवारी सकाळी विष्णू बागडे यांचा मृत्यू झाला. बागडे यांच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट महापालिकेच्या सतरा मजली प्रशासकीय इमारतीमध्ये आणला. कुटुंबीयांच्या आक्रमक पावित्र्याने महापालिका इमारतीत गोंधळ उडाला होता. यावेळी कुटुंबीयांनी सतरा मजलीच्या आवारात ठिय्या मांडत तेथेच आक्रोश केला.
प्रशासन म्हणते ही तर न्यायालयीन बाब-
मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी आयुक्त सतीश कुळकर्णी यांच्या दालनात जावून त्यांची भेट घेतली. तेथे देखील कुटुंबीयांचा आक्रोश सुरुच होता. यावेळी मयत कर्मचारी यांच्या बडतर्फीचे आदेश रद्द करुन त्यांच्या वारसांना अनुकंपाचा व निवृत्तीचे लाभ देण्याची मागणी केली. यावेळी आयुक्तांनी ही बाब न्यायालयीन असल्याचे सांगितले. तसेच सहानुभूतीने शक्य ती कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेला.