जळगाव - पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या कारला आज सकाळी धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ अपघात झाला. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
आमदार सतीश पाटील कार अपघातातून थोडक्यात बचावले; पाळधी गावाजवळील घटना - पाळधी गाव
आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या कारचा धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
पाटील हे आज सकाळी मुंबईहून जळगावला आले. त्यानंतर आपल्या कारने ते जळगावहून घरी पारोळ्याला जात होते. पाळधी गावाजवळ रिंगणगाव-खर्ची फाट्यावर एका दुचाकीस्वाराने आजूबाजूला न बघता दुचाकी सरळ मुख्य रस्त्यावर आणली. त्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात पाटील यांच्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या खाली उतरून थेट विद्युत रोहित्राच्या ताण दिलेल्या तारांवर जाऊन चढली. सुदैवाने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनर्थ टळला.
अपघातात पाटील यांच्यासह कारमध्ये असलेले त्यांचे सहकारी यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. या अपघाताची माहिती मिळताच पाटील यांच्या समर्थकांनी घटनास्थळी धाव घेतली. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना देखील या अपघाताची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी पाटील यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.