जळगाव -चाळीसगाव हे गांजा अन् गुटख्याचे हब आहे. चाळीसगावमधून गुटखा, गांजा राज्यात पुरविला जातो. पोलिसांचा आर्शीवाद अवैध व्यावसायिकांना असल्याने अवैध व्यवासायिकांवर कारवाई पोलीस करत नाहीत. शुक्रवारी (दि. 16 ऑक्टोबर) मेहूणबारे पोलिसांच्या हद्दीतून ट्रक भरुन गुटखा गेला. मी त्या गाडीचा पाठलाग करत असल्याने पोलिसांनी गुटख्याचा ट्रक जप्त केला. रात्री आठ वाजता पकडलेला ट्रक सकाळी आठपर्यंत जळगावला येऊ शकला नाही. यावरून पोलीस व अवैध व्यवासायिकांचे संबंध कसे आहेत, हे लक्षात येते. आमदार या नात्याने मी तक्रारदार होतो पण माझी पोलिसांनी तक्रार घेतली नाही. याबाबत उच्च न्यायालयात मी दाद मागणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आमदार चव्हाण म्हणाले, मेहुणबारे येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे पन्नास लाखांचा गुटखा घेवून जाणारा ट्रक (एमएच 18 एम 0553) पकडला. या ट्रकमधील संपूर्ण अवैध गुटख्याची तपासणी करावी, संबंधित गुटखा मालक व्यक्तींवर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा ट्रक मेहुणबारे पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न करता सोडला. याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांना तसेच जिल्हापेठ पोलीस निरीक्षक पटेल यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तीन तास वाद चालल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या सुचनेनंतर अखेर ट्रक जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आला.