जळगाव -भडगाव-पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ऐन पेरणीच्या काळात महावितरण कंपनीकडून कृषी पंपांच्या वीजबिलांची शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली सुरू आहे. महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात आमदार किशोर पाटील यांनी आज (सोमवारी) आक्रमक भूमिका घेत महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले. शेतकऱ्यांना त्रास देणे महावितरण कंपनीने बंद केले नाही, तर यापुढे शिवसेना स्टाईलने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या आमदाराने वीजबिलप्रश्नी आक्रमक होऊन आंदोलन केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
महावितरण कंपनीच्या कार्यालयाला ठोकले टाळे -
महावितरण कंपनीकडून सध्या भडगाव व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सक्तीने कृषी पंपांच्या वीजबिलांची वसुली सुरू आहे. यामुळे शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. आधीच शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत होत नाही. जळालेले विद्युत रोहीत्र बदलून दिले जात नाहीत, अशातच आता वीजबिलांची सक्तीने वसुली सुरू आहे. यासंदर्भात तक्रारी वाढल्याने शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी महावितरण कंपनीने सक्तीने वीजबिल वसुली न करता शेतकऱ्यांना सवलत देण्याची मागणी केली होती. परंतु, तरीही वीज बिल वसुलीचा प्रकार सुरूच असल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सोमवारी महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलनप्रसंगी आमदार पाटील यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले.
महावितरणची मनमानी सुरू असल्याचा केला आरोप -