जळगाव-राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक आहे. या अर्थसंकल्पात काहीही विशेष तरतुदी नाहीत. एकंदरीत काय तर महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली.
शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा म्हणजे फसवी बाब
गिरीश महाजन म्हणाले की, कर्जमाफीच्या योजनेत 45 टक्के शेतकरी वंचित राहिले असून, त्यांना एका नव्या पैशाची मदत झालेली नाही. शेतकर्यांना धान्यासाठी, वीजबिलासाठी कुठल्याही प्रकारे सवलत दिलेली नाही. तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याजदर ही फसवी बाब आहे. महाराष्ट्रात 80 टक्के शेतकर्यांची कर्ज घेण्याची मर्यादाच ५० हजार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकर्यांना मिळणार नाही, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.
इंधन दरवाढीपासून कुठलीही सवलत नाही
राज्यात अनेक सिंचन प्रकल्प प्रलंबित आहेत. आमच्या काळात आम्ही सगळ्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊनही महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पांसाठी ठोस अशी कुठलीही तरतूद केलेली नाही. पेट्रोल-डिझेलच्या संदर्भात केंद्राविरोधात राज्यात आंदोलने केली जातात. मग राज्य सरकारने तरी कुठे इंधन दरवाढीपासून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. इंधन दरवाढीपासून कुठलीही सवलत या सरकारने दिलेली नाही, त्यामुळे त्यांनी आता केंद्रावर टीका करण्याचे धाडस करू नये, असेही महाजन म्हणाले.
यांनी नव्याने काय केले?
भाजपच्या काळातील बहुतांश योजना यावेळेच्या अर्थसंकल्पात आहेत. ज्यावर आधीच तरतूद केली गेली आहे. यांनी नवीन असे काहीही केले नाही. आरोग्यावर मोठी तरतूद केल्याचे ते म्हणताय पण आधीच्या तरतुदींचे काय? महाविकास आघाडी सरकारने शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या तोंडाला केवळ पानेच पुसली आहेत, असेही महाजन शेवटी म्हणाले.
हेही वाचा -विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास; राज्य सरकारच्या निर्णयाचे पालकवर्गाकडून स्वागत
हेही वाचा -चांद्यापासून ते बांद्यापर्यंत प्रत्येक मराठी माणसाचे हित साधणारा अर्थसंकल्प - मंत्री गुलाबराव पाटील