जळगाव - एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील राजकीय हाडवैर जगजाहीर आहे. अशातच महाजन यांनी खडसेंच्या उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'एकनाथ खडसे यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. विरोधी पक्षनेता तसेच मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली तर आम्हाला विरोधीपक्ष म्हणून चांगले काम करता येईल', अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.
जळगावातील जीएम फाउंडेशन आणि निरामय सेवा संस्था यांच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी जिल्हा रुग्णालयाला 5 व्हेंटिलेटर्स प्रदान करण्यात आले, याप्रसंगी महाजन बोलत होते. कोरोनाचा जिल्ह्यातील प्रसार, शासनाने राज्यात मद्यविक्रीला दिलेली सशर्त परवानगी, अशा मुद्द्यांवर त्यांनी यावेळी मात्र मांडली. दरम्यान, एकनाथ खडसेंच्या उमेदवारीच्या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले की, एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना विधानपरिषदेच्या उमेदवारीची संधी मिळाली तर निश्चितच फायदा होणार आहे. त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून प्रभावीपणे काम केले आहे. मंत्री म्हणून त्यांना चांगला अनुभव आहे. राजकीय क्षेत्राचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना तिकीट मिळाले तर आम्हाला विरोधी पक्ष म्हणून अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा...पाण्याअभावी 'त्याचा' रस्त्यावरच तडफडून मृत्यू, कोरोनाच्या भीतीने कोणी जवळही गेले नाही