जळगाव -येथे खाऊचे आमिष दाखवून 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम सौरव वासुदेव खर्डीकर (वय 26, रा. राधाकृष्णनगर, जळगाव) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने रविवारी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली होती.
आरोपी सौरभ खर्डीकर याने 10 जुलैरोजी दुपारी 12 ते 1 दरम्यान शहरातील सुभाष चौकातील भवानी माता मंदिराजवळून एका भिक्षुक अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून गोलाणी मार्केटमध्ये आणले होते. त्यानंतर, मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरील शौचालयात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. या घटनेनंतर पीडितेच्या आत्याने दिलेल्या फिर्यावरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोलाणी मार्केटमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून फुटेज मिळवले होते. त्यानंतर खबऱ्यांच्या माध्यमातून आरोपी सौरभ याची माहिती मिळवली होती. त्यानंतर शनिवारी रात्री त्याला घरून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर पोलिसांनी त्याला रविवारी दुपारी न्यायालयात हजर केले होते.