जळगाव :भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे मागील आठवड्यात एका 19 वर्षीय नराधमाने एका सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला ठार मारल्याचा प्रकार घडला. यावेळी या आरोपीला जिल्हा पोलीस दलाने तात्काळ अटक केली होती. मात्र त्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात आले. यावेळी भडगावच्या गोंडगावातही पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी भडगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.
मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद :यावेळी पीडितेच्या आई-वडिलांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला. आरोपीला कठोर शिक्षा होऊन तो खटला जलद गतीने पुढे कसा नेता येईल, याबद्दल पोलिसांशी बोलणे झाले आहे, असे त्यांनी सांगितले. पाचोरा येथील स्थानिक पत्रकारांनी त्यांच्या वृत्तांकनातून मुख्यमंत्री यांनी कुठलाही ठोस असा शब्द दिला नाही, त्यांनी सर्वांसमोर फोनवर संवाद साधून 'फक्त चमकोगिरी'च केली, अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले. यानंतर आमदार किशोर पाटील यांनी स्वतः पत्रकार संदीप महाजन यांना फोनवरून संवाद साधत अश्लील शिवीगाळ केली.
आमदार किशोर पाटील यांचे स्पष्टीकरण : व्हायरल झालेल्या फोनवरील संवादाच्या ऑडिओ क्लिप संदर्भात आमदार किशोर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ती ऑडिओ क्लिप माझीच आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. त्यात राज्य सरकार योग्य ती कारवाई तातडीने करत आहे. परंतु संबंधित पत्रकाराने चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण त्याला शिवीगाळ केल्याचा दावा आमदार किशोर पाटील यांनी केला आहे. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे, जे केले ते सत्य सांगण्याची हिंमत ठेवतो, असे ते म्हणाले. मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा पत्रकारांनी आमदार किशोर पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, पत्रकारांच्या विरोधात हे वक्तव्य नाही. त्या प्रवृत्तीच्या विरोधात मी बोललो आहे. अख्ख्या भारतातल्या पत्रकारांना मी अंगावर घ्यायला मूर्ख नाही, असे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले.