जळगाव- काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. पक्षात लोक येतील आणि जातील, पण पक्ष कायम राहील. पूर्वी काँग्रेसचा कार्यकर्ता समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत होता. म्हणून काँग्रेस पक्ष देशात पहिल्या क्रमांकावर होता. परंतु, आता सर्वच कार्यकर्ते नेते झाले म्हणून काँग्रेस सत्तेबाहेर गेली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जागा आरएसएसने घेतल्याने भाजपची केंद्रात सत्ता आली. अजूनही वेळ गेलेली नाही. गटतट विसरून एकत्र या. जोमाने कामाला लागा, अशा शब्दांत राज्याचे आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कान टोचले.
सर्वच कार्यकर्ते नेते झाले म्हणून काँग्रेस सत्तेबाहेर गेली; मंत्री पाडवींनी टोचले कार्यकर्त्यांचे कान - जळगाव काँग्रेसचे राजकारण
काँग्रेस पक्ष देशात पहिल्या क्रमांकावर होता. परंतु, आता सर्वच कार्यकर्ते नेते झाले म्हणून काँग्रेस सत्तेबाहेर गेली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जागा आरएसएसने घेतल्याने भाजपची केंद्रात सत्ता आली, असल्याचे म्हणत अॅड पाडवी यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. खडसेंच्या मुद्यावर बोलताना एकनाथ खडसे आणि माझे व्यक्तिगत संबंध आहेत. ते जरी आता मित्र पक्षात असले तरी राजकारण हे राजकारणाच्या जागी, स्पर्धा ही स्पर्धा असते. बरोबर राहूनही स्पर्धा सोडायची नसते. तुम्हाला काही अडचण आली तर मला सांगा, असेही पाडवी यावेळी म्हणाले.
मंत्री अॅड. के. सी. पाडवी हे शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आलेले होते. अॅड. पाडवी हे काँग्रेसचे जळगाव जिल्हा संपर्क मंत्री असल्याने या दौऱ्यात त्यांनी सायंकाळी काँग्रेस भवनात जिल्ह्यातील काँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत पक्षीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस डी. जी. पाटील आदी उपस्थित होते.
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर बैठकीत नाराजीचा सूर-
माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खडसेंच्या पक्षांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. आजवर खडसेंनी काँग्रेसला खूप त्रास दिला आहे. भाजपात त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून ते मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीत आले आहेत. आपल्या पक्षांची ध्येयधोरणे, विचारधारा आवडली म्हणून ते इकडे आलेले नाहीत. शिवाय राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीच्या काळात जागा वाटपाच्या मुद्द्यावर खूपच ताठर भूमिका घेतली होती. हा अनुभव गाठीशी असल्याने यापुढच्या काळात आपण स्वबळावर पुढे जाऊया, असा सूर स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला. या विषयावर पाडवींनी आपल्या भाषणात स्पष्टीकरण दिले. एकनाथ खडसे आणि माझे व्यक्तिगत संबंध आहेत. ते जरी आता मित्र पक्षात असले तरी राजकारण हे राजकारणाच्या जागी, स्पर्धा ही स्पर्धा असते. बरोबर राहूनही स्पर्धा सोडायची नसते. तुम्हाला काही अडचण आली तर मला सांगा, असेही पाडवी यावेळी म्हणाले.