जळगाव -मागचे सरकार हे भाजप-शिवसेना युतीचे नव्हतेच. तर ते फक्त भाजपचे होते. त्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी होती खरी; मात्र, शिवसेनेला सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा स्कोप नव्हता, अशी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला चिमटा काढला.
जयंत पाटील - जलसंपदा मंत्री मंत्री जयंत पाटील हे 'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे'निमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चोपडा शहरातील नगरपालिका प्रशासनाच्यावतीने उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे शुक्रवारी दुपारी त्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार लता सोनवणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा चौधरी, गटनेते जीवन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, चंद्रहास गुजराथी, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे आदी उपस्थित होते.
...अन् आमचे विरोधक म्हणतात, यांनी काहीही केले नाही-
मंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले की, ज्याठिकाणी लोक चालत होते, सायकलवर होते. आता लोक चारचाकीत आले. हा गेल्या 30 ते 40 वर्षांत भारतात झालेला मोठा बदल आहे. या देशात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक काळ राज्य केले आहे. आमचे विरोधक सांगतात की यांनी देशात काय केले? गेल्या काळात देशात जी स्थित्यंतरे घडली, तो बदल म्हणजेच आमचे काम आहे. आज माझ्याकडे ज्या मागण्यांची निवेदने आली आहेत, त्यातील मागण्या या स्थित्यंतरापलीकडच्या आणि प्रगतीच्या पुढच्या पावलाच्या आहेत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
चोपड्यात सर्वपक्षीयांना सोबत घेऊन विकास होतोय- अरूणभाई गुजराथी
चोपडा नगरपालिकेच्या वतीने आज सामाजिक सभागृहाचे उदघाटन होत आहे. या निमित्ताने शहराच्या वैभवात भर पडली आहे. आजवर नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत. सर्वपक्षीयांना सोबत घेऊन याठिकाणी विकास होत आहे. निधीचा उपयोग सत्कारणी लागावा, ही सर्वांची जबाबदारी आहे, असे सांगत अरुणभाई गुजराथी यांनी चोपडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.