जळगाव- शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या आक्रमक भाषण शैलीमुळे 'खान्देशची मुलुख मैदान तोफ' म्हणून परिचित आहेत. मात्र, सध्या ते एका वेगळ्याच विषयावरून चर्चेत आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर या मंत्री महोदयांचा थाटच निराळा आहे. ते सध्या प्रत्येक कपड्यावर 'मॅचिंग मास्क' वापरत आहेत. गुलाबरावांचा हा थाट नामनिराळा ठरला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीच्या निमित्ताने गुलाबराव पाटील मंगळवारी (दि.9 जून) सायंकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले होते. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या कपड्याच्या रंगाचेच मास्क तोंडाला लावले होते. त्यांच्या मास्कने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रत्येक जण कुतूहलाने त्यांना याबाबतीत विचारणा करत होता. मात्र, ते केवळ स्मितहास्य करत आपला प्रतिसाद देताना पाहायला मिळाले.
या विषयाबाबत खुद्द पत्रकारांनी विचारणा केली असता, गुलाबराव पाटील यांनी मॅचिंग मास्कचे रहस्य सांगितले. 5 जून रोजी गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी दोन नवे कपडे शिवण्यासाठी टेलरकडे दिले होते. दोन्ही कपडे शिवून झाल्यावर उरलेल्या कापडाचे त्या टेलरने तोंडाला बांधण्यासाठी ट्रिपल लेअरचे मास्क शिवले. हे मास्क कपड्यांवर मॅचिंग असल्याने गुलाबराव पाटील ते वापरत आहेत.