जळगाव - भाजप-सेनेत युती होणार आहे, असे असताना जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपचे 2 ते 3 लोक माझ्याविरुद्ध अपप्रचार करत आहेत. भाजपने यांना शांत केले नाही तर आम्ही त्यांना सेनास्टाईलने शांत करू. तसेच आमच्याविरुद्ध अपप्रचार केला आणि काही बरे वाईट झाले तर बोलायचे नाही. आम्ही काय मेलेल्या आईचे दूध प्यालेलो नाही, अशा शब्दांत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिला.
आम्ही काय मेलेल्या आईचे दूध प्यालेलो नाही - गुलाबराव पाटील यांचा भाजपला इशारा हेही वाचा -नेमका का दिला अजित पवारांनी राजीनामा?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव-ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव शहरात शुक्रवारी दुपारी सेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्यात गुलाबरावांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली. तर विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील जळगाव-ग्रामीण मतदारसंघात खऱ्या अर्थाने राजकीय वातावरण तापू लागले आहे. चार दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. पाटील यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावात भाजपचा मेळावा घेऊन त्यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले होते.
हेही वाचा -धुळे: शिरपूर स्फोट प्रकरणी 3 जणांना अटक
विशेष म्हणजे, युतीच्या तहात ग्रामीण मतदारसंघ सेनेच्या वाट्याला असताना भाजपने घेतलेला मेळावा गुलाबरावांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे पी. सी. पाटलांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी धरणगावात सेनेचा मेळावा घेऊन भाजपवर शरसंधान साधले.
आमच्या विरुद्ध प्रचार केला तर याद राखा -
'मंत्री या नात्याने मला माहिती आहे की युती होणारच आहे. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, दोन दिवसात युतीची घोषणा होईल. काहीही झाले तरी कोंबडा चार वाजता बांग देणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात आम्ही युती धर्माचे पालन करून भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांचा प्रचार केला. मात्र, आता त्यांच्या पक्षाचे दोन ते चार लोक आमच्या विरोधात षड्यंत्र रचत आहेत. या लोकांना आवरा. तसेच जे लोक सेनेचे काम करणार नाहीत, त्यांना मतदारसंघाबाहेर पाठवा, असे मी गिरीश महाजन तसेच उन्मेष पाटलांना सांगणार आहे. आमच्या विरुद्ध प्रचार केला तर याद राखा. काही बरे वाईट झाले तर बोलायचे नाही. कारण आम्ही काय मेलेल्या आईचे दूध प्यालेलो नाही', असा इशाराच यावेळी गुलाबरावांनी भाजपला दिला.
हेही वाचा -जळगावात भाजपकडून स्वबळाची तयारी; सेनेच्या मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा
मंत्री होतो म्हणून शांत होतो -
गुलाबरावला पहिल्या औकातीवर आणू नका. मंत्री होतो म्हणून मी शांत होतो. तीन वर्षे मंत्रिपदाची गरिमा राखली. या काळात मंत्रिपदाला डाग लागू दिला नाही. मंत्री होण्यासाठी जसा स्वच्छ गेलो तसाच मंत्रिपदावरून पायउतार होताना स्वच्छ आहे. आता परत युतीचे सरकार आले आणि पक्ष प्रमुखांनी कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली तर हा मतदारसंघ बारामती केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.