जळगाव -'खान्देशची मुलुख मैदान तोफ' म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या भाषणाच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. मात्र, त्यांच्यात एक गायक पण दडला आहे. ही बाब बहुदा कुणाला माहिती नाही. गुलाबराव पाटील यांच्यातील गायक नशिराबादकरांनी प्रजासत्ताक दिनाच्या (दि. 26 जाने.) सायंकाळी अनुभवला. निमित्त होते, एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनाचे.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील एका स्थानिक वृत्तवाहिनीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मंगळवारी (दि. 26 जाने.) सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमावेळी उपस्थितांच्या खास आग्रहास्तव गुलाबराव पाटील यांनी माईक हाती घेतला. हिंदी चित्रपटातील एक सदाबहार गीत त्यांनी आपल्या सुरेल आवाजात सादर करत उपस्थितांची मने जिंकून घेतली.