जळगाव -केंद्र सरकारने अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. महिला, शेतकरी, उद्योजक, नोकरदार वर्ग, युवक अशा साऱ्यांचा अपेक्षाभंग करणारा हा अर्थसंकल्प आहे. केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे 'बोतल वही हैं, शराब बदल गई हैं', अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे.
गुलाबराव पाटील हे सोमवारी (दि. 1 फेब्रुवारी) सायंकाळी जळगावात आले होते. अजिंठा शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटी तर नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कारण तेथे निवडणुका लवकरच अपेक्षित आहेत. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग, नाशिक-पुणे, कराड-चिपळूण रेल्वे मार्गासाठी या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची तरतूद केलेली नाही. रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प एकत्रित करून केंद्राने आपले अपयश आणि अकार्यक्षमता लपवण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते कोरोनाच्या काळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी या अर्थसंकल्पामुळे निराशा आली आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.