जळगाव- कोकण दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नाणार प्रकल्पाबाबतच्या वक्तव्यानंतर नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले होते. मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या राणेंना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणेंना टीका करण्याशिवाय दुसरे काही येत नाही. टीका केल्याशिवाय त्यांचे अस्तित्त्वच राहू शकत नाही, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी राणेंना चिमटा काढला आहे.
शिवजयंती निमित्ताने जळगावात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आज सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला हजेरी लावल्यानंतर गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कोकणच्या विकासात काय योगदान आहे? असा सवाल नारायण राणेंनी केला होता. तसेच हे राज्य अधोगतीकडे चाललय. सरकार चालत नसून भ्रष्टाचाराची दुकाने सुरु आहेत आणि यात मुख्यमंत्री कार्यालयाचाही समावेश आहे, अशी टीका राणेंनी केली होती. या टीकेला गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले. टीका करणे हेच नारायण राणे यांचे काम आहे. त्याशिवाय दुसरे त्यांना येत नाही, असे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.