जळगाव - राज्यभरात जिल्हा परिषदेच्या शाळांना मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. त्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना लागलेली ही आग काही दिवसात माध्यमिक शाळांना देखील लागण्याची भीती आहे. ही आग विझवायची असेल आणि जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या टिकवायची असेल तर आम्ही जसे इतर पक्षाची नेतेमंडळी फोडतो, त्याप्रमाणे तुम्ही इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी फोडा, असे आवाहन शिवसेना उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना उद्देशून केले.
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा रविवारी दुपारी गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. या सोहळ्याला शिक्षक आमदार डॉ. सुधीर तांबे, रावेरचे आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक आदी उपस्थित होते
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, आज राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यांची पटसंख्या उद्ध्वस्त झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या टिकली असती तर आज 50 हजार शिक्षक नोकरीला लागले असते. मात्र, या शाळांची पटसंख्या दुर्दैवाने टिकली नाही. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक मात्र कौतुकास पात्र आहेत. कारण त्यांनी प्रयत्न केल्यानेच गेल्या वर्षभरात जिल्ह्यात 2 हजार 600 विद्यार्थ्यांची भर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झाली आहे. त्यामुळे यापुढील काळातही जिल्हा परिषदेच्या शाळांना वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.