जळगाव -बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येबाबत आपण आधीपासून सांगत होतो की त्यात काहीही तथ्य नाही. पण भाजपने या प्रकरणाचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वापर केला. आता या प्रकरणाचे 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' झाले आहे. गेल्या दीड महिन्यात सीबीआयच्या चौकशीत काय झाले? तर 'खोदा पहाड, निकला चुहा', अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण म्हणजे 'खोदा पहाड, निकला चुहा' मंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी सोमवारी दुपारी जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह, नगरसेवक व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून भाजपवर टीका केली. ते पुढे म्हणाले, उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर भाजपचे नेते एक शब्दही बोलणार नाहीत. दुसऱ्याकडे बोट दाखवणे सोपे असते. परंतु, चार बोट आपल्याकडे असतात, हे भाजप नेत्यांच्या लक्षात आले आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आपण पूर्वीपासून सांगत होतो की, या प्रकरणात काही एक तथ्य नाही. मात्र, भाजपने त्याचा राजकारणासाठी वापर केला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने सोडलेले हे एक पिल्लू होते. याच्या आधी कधी आत्महत्या झाल्या नाहीत का? यांच्यावेळी दीड लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण एकाची तरी सीबीआय चौकशी झाली का? ज्या शेतकऱ्याने उडी मारून आत्महत्या केली, त्याच्या कुटुंबीयांना राज्यपाल भेटले नाहीत. पण अभिनेत्री कंगना रनौतला त्यांनी भेट दिली. हे काय सगळं राजकारण तर होतं. मात्र, आता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचे 'दूध का दूध, पाणी का पाणी' झाले आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
दीड महिन्यात काय झाले?
आजवर भाजपचे नेते महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करत होते. महाराष्ट्र पोलिसांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात काहीच केले नाही, असा आरोप त्यांच्याकडून केला जात होता. पण गेल्या दीड महिन्यात सीबीआयच्या चौकशीत काय झाले? तर 'खोदा पहाड, निकला चुहां', असा चिमटा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी काढला.