जळगाव -भाजपच्या राज्यातील नेतृत्त्वाकडूनच आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या आरोपाचा धागा पकडत शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना चिमटा काढला आहे. 'नाथाभाऊंनी मला वडिलांसारखं प्रेम दिले. मात्र, मुलगा कधी मानले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अशी वाईट वेळ आली आहे', अशा शब्दांत गुलाबरावांनी खडसेंना लक्ष्य केले.
भुसावळ येथे गुलाबराव पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना कानपिचक्या दिल्या. पाटील पुढे म्हणाले, 'भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुलगा म्हणून माझा वापर केला असता, तर मी पक्का माणूस आहे. कधीही पाठीमागे हटलो नसतो. माझ्यासारखा सच्चा माणूस तुटला नसता. नाथाभाऊंनी सोबत ठेवलेल्या लोकांचा रक्तगट कधी तपासला नाही. त्यांनी रक्तगट तपासून माणसे ठेवली असती, तर गुलाबराव पाटलांसारखा सच्चा माणूस कधीही तुटला नसता. कालसुद्धा रक्षा खडसे लोकसभेला उभ्या राहिल्या. तेव्हा मी त्यांच्या प्रचाराला गेलो होतो. त्यावेळी मी माझी मागची दुश्मनी काढली नाही. मला या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पाहायचे होते', असे गुलाबराव पाटील म्हणाले.