जळगाव -गेल्या अनेक दिवसांपासून हजारो शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. पण, केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. भाजपला शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल, अशी टीका राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
बोलताना मंत्री गुलाबराव पाटील मंगळवारी (26 जाने.) मंत्री गुलाबराव पाटील जळगावात होते. यावेळी एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यपालांनी शेतकऱ्यांना नाकारलेली भेट, शेतकरी आंदोलनाविषयी केंद्र सरकारची भूमिका या विषयांवर आपले मत मांडले.
आदिवासी शेतकरी नाहीत का?
गुलाबराव पाटील म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे हे आंदोलन आता देशभरात पसरले आहे. आता आदिवासी शेतकरीही या आंदोलनात उतरला आहे. त्यामुळे हे आंदोलन आता व्यापक झाले आहे. मात्र, केंद्रातले भाजप सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांना शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल. शेतकरी आंदोलनात आदिवासी उतरल्याने हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसून ते आदिवासींचे आंदोलन आहे, अशी टीका भाजपकडून सुरू आहे. मात्र, आदिवासी शेतकरी नाहीत का? असा सवालही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.
राज्यपालांनी भेट नाकारणे चुकीचे
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेतकऱ्यांना भेट न दिल्याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यपाल हे राज्याचे 'पाल' आहेत. त्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, भेट नाकारली, हे चुकीचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचे राज्यपाल होण्यापूर्वी ते मुख्यमंत्री देखील होते, असेही त्यांनी सांगितले.