जळगाव -महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युतीचे नाटक करून बंडखोरीला खतपाणी घातले. या माध्यमातून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. आता बिहारमध्ये भाजप हाच फॉर्म्युला वापरून नितीश कुमारांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आम्ही भाजपच्या बंडखोरीचा मुद्दा मतदारांसमोर मांडणार आहोत, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगावात दिली.
शहरातील अजिंठा विश्रामगृहात गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी बिहार विधानसभा निवडणूक, एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा अशा विषयांवर मते मांडली. ते पुढे म्हणाले, बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला 'स्टार प्रचारक' म्हणून संधी दिली आहे. हा जळगाव आणि खान्देशाचा सन्मान आहे, असे मी मानतो. योगायोगाने आपल्या आणि त्यांच्या प्रदेशातील भाषेचा वेगळा वेगळा प्रभाव असणार आहे. मी निश्चितच पक्षासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
भाजपचा चेहरा उघड करू-
भाजपने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरीच्या माध्यमातून शिवसेनेसोबत जो दगाफटका केला, तोच कित्ता आता ते बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत गिरवत आहेत. आपण पाहिले असेल की बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टी कोणी दुसरं नाही तर भाजप फोडत आहे. भाजपने ज्याप्रमाणे महाराष्ट्रात युती असूनही आमच्या विरोधात अधिकृत बंडखोर उमेदवार उभे केले होते, त्याचप्रमाणे आता भाजपकडून तिकीट नाकारलेले लोक जनशक्ती पार्टीमध्ये जात आहेत. म्हणजेच 'चीत भी मेरी आणि पट भी मेरी', अशी भाजपची खेळी आहे. ज्याठिकाणी नितीश कुमारांचा उमेदवार आहे, त्याचठिकाणी लोक जनशक्ती पार्टीच्या उमेदवाराला भाजपकडून बळ दिले जात आहे.