जळगाव -राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे, तीनचाकी रिक्षा आहे. अशा शब्दांत विरोधी पक्ष भाजपकडून टीका केली जाते. परंतु, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालावर एक नजर टाकली तर, महाविकास आघाडीचे सरकार हे योग्य पद्धतीने काम करत असल्याचे जनतेच्या कौलवरून स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी मत दिले आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे प्रवक्ते तथा सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव जिल्हा शिवसेनेची आज महत्वपूर्ण बैठक शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीपूर्वी गुलाबराव पाटील हे पत्रकारांशी बोलत होते.
हा तर सराव सामना-
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी सराव सामन्यासारखीच होती. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्य पातळीवरील ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत आम्ही तीनही पक्ष एकत्र लढलो. यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. भाजपचे आमदार असणाऱ्या ठिकाणी देखील जनतेने आमच्या बाजूने कौल दिला. या निवडणुकीचा निकाल म्हणजे, महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत असल्यावर जनतेने एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार हे यापुढेही अशाच प्रकारे काम करत राहील, असा विश्वास देखील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
हे तीनचाकी नाहीतर चारचाकी सरकार-
महाविकास आघाडीचे सरकार हे तीन चाकी रिक्षा असल्याची टीका भाजपकडून सातत्याने केली जाते. परंतु, या निवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडी सरकारवर जनतेचा विश्वास असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. आमचे तीन पक्षांचे सरकार असून त्याचे चौथे चाक जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे आमचे सरकार तीन चाकी नाही तर चारचाकी असल्याचा चिमटाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी भाजपला काढण्याची संधी सोडली नाही.