जळगाव- केळीचे विक्रमी उत्पादन घेण्यात रावेर-यावल तालुका अग्रेसर असताना केळी उत्पादकांना न्याय मिळू शकला नाही. केळीला फळाचा दर्जा, विमा संरक्षण, नुकसान भरपाई प्रती हेक्टरी १ लाख मिळावी व केळीला शालेय पोषण आहारात समाविष्ट करणे हा यापुढे एमआयएम पक्षाचा अजेंडा असेल. येत्या अधिवेशनात राष्ट्रीय फलोत्पादन मंत्रालयाला केळीबाबत निर्णय घ्यायला भाग पाडणार, असे आश्वासन 'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिले.
हेही वाचा - मोदींनी ५ वर्षांत जे देशाचे नुकसान केले, ते काँग्रेसने कधीच केले नाही - राहुल गांधी
रावेर विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार विवेक ठाकरे यांच्या प्रचारासाठी रविवारी फैजपूर येथे सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवर कडाडून प्रहार केला. दरम्यान, तिहेरी तलाक विधेयक चुकीच्या पद्धतीने मंजूर झाल्याने मुस्लीम महिलांना न्याय मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे रावेर-यावल भागात उच्च महाविद्यालयीन उर्दू शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसल्याने त्यांनी मुस्लीम बांधवांच्या मतांच्या जोरावर पदे भूषवणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी आत्महत्या करत आहेत. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. जीडीपीए दर कमी होत आहे. महागाई वाढत आहे. जीएसटी, नोटबंदीमुळे व्यापारी, शेतकरी त्रस्त आहेत. गरीब मुस्लिमांनाही आरक्षण द्यावे. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात सुद्धा सरकार संवेदनशील नसल्याचा त्यांनी आरोप केला.