महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव : चोपडा एमआयडीसीच्या जमिनीचे मोजमाप सुरू; लवकरच होणार भूखंड वाटपाची प्रक्रिया - चंद्रकांत सोनवणे चोपडा एमआयडीसी

चहार्डी गावाजवळ चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात ही एमआयडीसी होणार आहे. या एमआयडीसीच्या उभारणीमुळे चोपडा तालुक्याच्या विकासाला चालना तर मिळणारच आहे शिवाय बेरोजगारांच्या हाताला कामही उपलब्ध होणार आहे.

chandrakant patil
चंद्रकांत सोनवणे.

By

Published : Feb 14, 2021, 6:06 PM IST

Updated : Feb 14, 2021, 6:56 PM IST

जळगाव -जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील 117 एकर जमिनीवर एमआयडीसी होणार आहे. या संदर्भात राज्य शासनाने नुकतीच मंजुरी देत अधिसूचना जारी केली आहे. चहार्डी गावाजवळ ज्या प्रस्तावित जमिनीवर एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. त्या जागेच्या मोजणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. जमिनीचे मोजमाप पूर्ण झाल्यानंतर इच्छुक उद्योजकांना भूखंड वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे. या साऱ्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.

माजी आमदार चंद्रकांत सोनवणे याबाबत माहिती देताना.
चहार्डी गावाजवळ चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात ही एमआयडीसी होणार आहे. या एमआयडीसीच्या उभारणीमुळे चोपडा तालुक्याच्या विकासाला चालना तर मिळणारच आहे शिवाय बेरोजगारांच्या हाताला कामही उपलब्ध होणार आहे. एमआयडीसीच्या मंजुरीसाठी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह विद्यमान आमदार लता सोनवणे यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे.

2015 पासून सुरू होता पाठपुरावा -

माजी आमदार चंद्रकांत सोनवणे हे आमदार असताना त्यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये चहार्डी येथील सरकारी व खासगी जमिनीविषयी राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयाला माहिती देऊन, ती औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची विनंती केली होती. याबाबत सोनवणे यांनी वारंवार राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. यांच्यानंतर त्यांच्या पत्नी आमदार लता सोनवणे यांनीही याच विषयाबाबत पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961च्या कलम 2 खंड 'ग' अंतर्गत एकूण 65 हेक्‍टर 22 आर नियोजित क्षेत्रापैकी 27 हेक्टर 23 आर हे अनुसूचित क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या संदर्भात शासनाकडून नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अवर सचिव किरण जाधव यांनी 28 सप्टेंबर 2020ला तसा आदेश दिला आहे. तसेच सन 1989 पासून महामंडळाच्या ताब्यात असलेले 20 हेक्टर 75 आर क्षेत्र, असे एकूण 47 हेक्टर 98 आर म्हणजे 117 एकर जमीन औद्योगिक विकासासाठी उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा -'साहेब! आमच्या तोंडाला पीक आलंय, लाईन तोडली, आता आम्ही काय खावं?' टरबूज उत्पादक शेतकऱ्यानं हुंदके देत मांडली व्यथा

चोपडा तालुक्याच्या विकासाला हातभार लागणार -

यासंदर्भात माहिती देताना चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले, चहार्डी येथील जमिनीवर एमआयडीसी उभारण्यास शासनाने मंजुरी दिल्याने आता खऱ्या अर्थाने चोपडा तालुक्याच्या विकासाला चालना मिळू शकेल. याठिकाणी जमिनीचे लवकरच मोजमाप पूर्ण करून उद्योजकांना भूखंड वितरित केले जाणार आहेत. उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या वीज, पाणी यासारख्या सर्व सुविधा शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. चोपडा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती तसेच नैसर्गिक साधन संपत्ती लक्षात घेता याठिकाणी उद्योगांसाठी पोषक वातावरण आहे. चोपडा तालुक्यातील बहुसंख्य भाग हा आदिवासीबहुल असल्याने कुशल मनुष्यबळ देखील उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यभरातील उद्योजकांना आम्ही याठिकाणी उद्योग उभारणीसाठी आमंत्रित करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषीपूरक उद्योगांना असेल प्राधान्य -

चोपडा एमआयडीसीत कृषीपूरक उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला या माध्यमातून हक्काची बाजारपेठ तर मिळेलच, याशिवाय स्थानिकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे, हा त्यामागचा उद्देश असल्याचेही सोनवणे यांनी सांगितले.

Last Updated : Feb 14, 2021, 6:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details