जळगाव - पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक वर्षासाठी बंधपत्रित उमेदवारांना जळगाव शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील जिल्हा काेविड रुग्णालयात नेमणूक दिली. यामध्ये रुजू न हाेणाऱ्या १९ बंधपत्रित उमेदवारांना वैद्यकीय शिक्षण संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांनी कडक शब्दांत नाेटीस बजावली आहे. या नाेटिशीत न्यायालयाचा अवमान, आदर्श वैद्यकीय नियमावलीचा भंग करत असल्याबाबत जाणीव करून देण्यासह पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्यावेळी करून दिलेल्या कराराचा भंग केल्यास ५० लाख रुपये दंड भरण्याची आठवण करून देण्यात आली आहे.
रुजू न हाेणाऱ्या १९ डाॅक्टरांना वैद्यकीय संचालकांनी बजावली नाेटीस - वैद्यकीय शिक्षण संचालक डाॅ. तात्याराव लहाने
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक वर्षासाठी उमेदवारांना जळगाव शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील जिल्हा काेविड रुग्णालयात नेमणूक दिली. यामध्ये रुजू न हाेणाऱ्या १९ बंधपत्रित उमेदवारांना वैद्यकीय शिक्षण संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांनी कडक शब्दांत नाेटीस बजावली आहे.
महिन्याभरापूर्वी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना राज्यातील ज्या जिल्ह्यात काेराेनाचा माेठ्या प्रमाणावर संसर्ग झाला. अशा सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत या डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात आली हाेती. त्यात जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५४ डाॅक्टरांची नियुक्ती केली. परंतु यातील केवळ २ डाॅक्टर्स रुजू झाले हाेते. तर उर्वरित सर्व डाॅक्टर्सनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ८ ऑक्टाेबर राेजी याचिका दाखल केली हाेती. यात न्यायालयाने १३ ऑक्टाेबरपर्यंत रुजू हाेण्याचे आदेश दिले हाेते. त्यानंतर ३४ डाॅक्टर्स रुजू झाले. तर १९ डाॅक्टर्स रुजू झालेले नाहीत. त्या सर्वांची यादी वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे पाठवली हाेती. या सर्व डाॅक्टरांना वैद्यकीय संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांनी नाेटीस बजावली आहे.
यात राज्यात काेराेनाची स्थिती गंभीर असताना करारानुसार तुम्ही सेवेत रुजू हाेण्यास तयार नसल्याचे स्पष्ट हाेते. हे काेराेनाच्या स्थितीत वैद्यकीय तज्ज्ञांची गरज असताना डीएमईआर संचालकाच्या निर्देशांचा भंग करणारे आहे. त्यामुळे तुम्हाला यासाठी न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही या नाेटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.