महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव : साहित्या नगरातील पाईपलाईन जोडणीचे काम सुरू करण्याचे महापौरांचे आदेश - जळगाव अमृत योजना बातमी

सुप्रीम कॉलनीवासियांना अमृत योजनेंतर्गत सुरळीत पाणी पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला असून दोन दिवस सुरू असलेले मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम पहाटे ६ वाजता संपले. महापौर भारती सोनवणे यांनी दुपारी कामाची पाहणी केली.

mayor-orders-to-start-pipeline-connection-work-in-sahitya-nagar-immediately
जळगाव : साहित्या नगरातील पाईपलाईन जोडणीचे काम सुरू करण्याचे महापौरांचे आदेश

By

Published : Feb 12, 2021, 7:46 PM IST

जळगाव -शहरातील सुप्रीम कॉलनीवासियांना अमृत योजनेंतर्गत सुरळीत पाणी पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला असून दोन दिवस सुरू असलेले मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम पहाटे ६ वाजता संपले. महापौर भारती सोनवणे यांनी दुपारी कामाची पाहणी केली. दरम्यान, साहित्या नगरात अमृतची पाईपलाईन टाकण्यात आली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली असता, तत्काळ काम हाती घेण्याच्या सूचना महापौरांनी केल्या.

भूमीगत पाणी साठवण टाकी तयार -

वाघूरच्या मुख्य जलवाहिनीला सुप्रीम कॉलनीतील अमृत योजनेची जलवाहिनी जोडण्याचे काम गुरुवारी सकाळी हाती घेण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे ६ वाजता काम पूर्ण झाल्यानंतर जळगाव शहराचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. महापौर सोनवणे यांनी कामाची पाहणी केली. अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनीत १५ लक्ष लिटरची भूमीगत पाणी साठवण टाकी तयार करण्यात आली असून त्याठिकाणी उच्च क्षमतेचे २ पंप बसविण्यात आले आहेत. जळगाव शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस चालणार असून उद्या दुपारी सुप्रीम कॉलनीची टाकी भरण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. टाकी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर उद्या किंवा परवा चाचणी घेतली जाणार आहे.

साहित्या नगरातील नागरिकांचा प्रश्न सुटणार -

सुप्रीम कॉलनीतील नितीन साहित्या नगरात अद्याप अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यात आलेली नसून नागरिकांना १० ते १५ दिवसांनी पाणी पुरवठा होतो. महापौर भारती सोनवणे यांच्याकडे नागरिकांनी याबाबत तक्रार केली असता, त्यांनी लागलीच मनपा अभियंता आणि मक्तेदार प्रतिनिधीकडून माहिती घेतली. नागरिकांना लवकरात लवकर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी अमृतची पाईपलाईन टाकण्याचे काम दोन दिवसांत हाती घेत एका महिन्यात ते पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

हेही वाचा - व्वा रे पठ्ठ्या.. सरपंचपदाची शपथ घेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर घेऊन गावात

ABOUT THE AUTHOR

...view details