जळगाव - येथील महापालिकेच्या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल होणारे कोरोनाचे रुग्ण योगाचे धडे गिरवत आहेत. यासाठी स्वतः महापौर भारती सोनवणे यांनी पुढाकार घेतला आहे. त्या दररोज सकाळी साडेसहा ते साडेसात वाजेदरम्यान रुग्णांना योगाचे धडे देत आहेत. मागील महिनाभरापासून हा उपक्रम सुरू आहे.
सध्या जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसताना दुसरीकडे कोरोनाचा मृत्यूदरही जास्त असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाल्याची स्थिती आहे. या परिस्थितीत महापालिकेच्या कोव्हिड सेंटरमधील स्थिती मात्र वेगळी आहे. योगाभ्यास केल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामुळे जळगावच्या महापौर भारती सोनवणे यांनी स्वतः पुढाकार घेत पालिकेच्या कोव्हिड सेंटरमधील रुग्णांना योगा शिकवण्याचा निर्णय घेतला. केसीई सोसायटीच्या सोहम योग केंद्राची मदत लाभल्याने हा उपक्रम लागलीच सुरू करण्यात आला. महिनाभरापासून तो अविरतपणे सुरू आहे. दररोज सकाळी एक तास महापौर भारती सोनवणे आणि योग शिक्षिका हेमांगी सोनवणे येथील रुग्णांना योग शिकवतात. रुग्णही त्यांच्याकडून प्राणायाम तसेच विविध आसने करून घेतात. या उपक्रमाचे फलित म्हणजे, रुग्णांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. अनेक रुग्णांनी आपल्याला मानसिक आणि शारीरिक लाभ झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्याचा महापौर सोनवणे यांचा मानस आहे.