ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हुतात्मा सागर धनगर यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार; ग्रामस्थांनी केली तयारी - चाळीसगाव हुतात्मा सागर धनगर न्यूज

31 जानेवारीला मणिपूरमध्ये कर्तव्यावर असताना चाळीसगाव तालुक्यातील जवानाला वीरमरण आले होते. सागर धनगर असे नाव असलेल्या या जवानावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

Sagar Dhangar
सागर धनगर
author img

By

Published : Feb 2, 2021, 10:13 AM IST

जळगाव - चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील हुतात्मा जवान सागर रामा धनगर (वय 23) यांच्यावर आज (मंगळवार) सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. सागर यांना 31 जानेवारीला मणिपूरमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले होते. सागर यांना वीरमरण आल्याने तांबोळे बुद्रुक गावासह जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. ग्रामस्थांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सागर यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली असून, त्यांना आज अखेरचा निरोप दिला जाणार आहे.

हुतात्मा सागर धनगर यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली

3 वर्षांपूर्वी सैन्यात दाखल -

सागर धनगर हे चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील रहिवासी होते. ते नोव्हेंबर 2017 मध्ये 5, मराठा इन्फन्ट्री बटालियनमध्ये रुजू झाले होते. सध्या ते मणिपूर याठिकाणी कार्यरत होते. 31 जानेवारीला त्यांना वीरमरण आले.

11 वाजता अंत्यसंस्कार -

वीरजवान सागर यांचे पार्थिव 1 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता मणिपूरच्या इम्फाळ येथून आसामच्या गुवाहाटीत आणले गेले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी विमानाने मुंबई विमानतळावर दाखल झाले. मुंबईहून लष्करी वाहनाने पार्थिव सागर यांच्या मूळगावी तांबोळे येथे आणले जाणार आहे.

चाळीसगाव तालुक्यातील तिसऱ्या जवानाला आले वीरमरण -

गेल्या 2 महिन्यांच्या काळात चाळीसगाव तालुक्यातील तिसऱ्या जवानाला वीरमरण आले आहे. यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना यश दिगंबर देशमुख हे हुतात्मा झाले होते. देशमुख हे चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी होते. त्यानंतर चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील जवान अमित साहेबराव पाटील यांचे कर्तव्यावर असताना अपघाती निधन झाले होते. त्यांच्या अंगावर बर्फाची लादी पडून ते गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा याच तालुक्यातील सागर यांना वीरमरण आले असून, जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

तांबोळे बुद्रुक गावाने गमावला दुसरा सुपुत्र -

तांबोळे बुद्रुक गावातील अरुणकुमार आनंदा जाधव यांना 2002 मध्ये वीरमरण आले होते. आता सागर धनगर यांच्या रूपाने तांबोळे गावाने आपला दुसरा सुपुत्र गमावला आहे. सागर यांना वीरमरण आल्याने अरुणकुमार जाधव यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details