जळगाव -'वीर जवान अमित पाटील अमर रहे' अशा जयघोषात सीमा सुरक्षा दलाच्या 183 बटालियनमध्ये कार्यरत असलेले जवान अमित पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी त्यांच्या मूळगावी वाकडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी (16 डिसेंबर रोजी) जम्मू-काश्मिरातील पूंछ भागात अमित पाटील यांना वीरगती प्राप्त झाली होती.
हुतात्मा जवान अमित पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
'वीर जवान अमित पाटील अमर रहे' अशा जयघोषात सीमा सुरक्षा दलाच्या 183 बटालियनमध्ये कार्यरत असलेले जवान अमित पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी त्यांच्या मूळगावी वाकडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
![हुतात्मा जवान अमित पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार amit patil was cremated](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9922868-811-9922868-1608286316506.jpg)
सकाळी अमित यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. कुटूंबीय व नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या वाहनातून शोकाकूल वातावरणात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेच्या पुढे तिरंगा धरून तरूण पुढे चालत होते. फुलांनी सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रेस सुरुवात झाली. वाकडी गाव व परिसरातून अंत्ययात्रा मोकळ्या मैदानात आली. तेथे सुरुवातीस वीर जवान अमित पाटील यांच्या पार्थिवास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर त्यांना पोलीस दल व सीमा सुरक्षा दलातर्फे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवास त्यांचे लहान बंधू यांनी अग्नीडाग दिला. वीर जवान अमित यांच्यामागे वडील साहेबराव पाटील, आई सकुबाई पाटील, पत्नी वैशाली, एक मुलगा, एक मुलगी, एक बहिण, एक भाऊ असा परिवार आहे.
पंचक्रोशीत देशभक्तीपर वातावरण-
अमित पाटील यांना आज अखेरचा निरोप देण्यात येणार असल्याने वाकडीच्या पंचक्रोशीत देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. अंत्ययात्रेत देशभक्तीपर गीते वाजवली जात होती. अंत्ययात्रेत सहभागी झालेले तरुण 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'अमर रहे.. अमर रहे.. शहीद जवान अमर रहे', अशा घोषणा देत होते.