जळगाव- दोन लहान मुलांसह तरुण विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. भारती सचिन पाटील (वय 32), गजानन सचिन पाटील (वय 12) आणि स्वामी सचिन पाटील (वय 7) अशी मृतांची नावे आहेत.
टाकरखेडा येथील सचिन जिजाबराव पाटील हा 21 रोजी सकाळी सहा वाजता गावातील एका तरुण मजुराला घेऊन शेतात ठिबक नळ्या टाकण्यासाठी गेला होता. नंतर सात वाजता त्याची पत्नी भारती ही आपली लहान मुले गजानन व स्वामी यांना सोबत घेऊन मदतीसाठी शेतात निघाली होती. शेतात जाताना तिने जेवणाचा डबादेखील सोबत नेला होता. सकाळी साडेनऊ वाजता वीज गेल्यानंतर सर्वांनी सोबत जेवण केले. अकरा वाजेनंतर सचिनने सोबत आणलेल्या मुलाला घरी जाण्यास सांगितले. मात्र, तो पायी जाईल, त्यापेक्षा मी तुला सोडून देतो म्हणून तो त्याला घेऊन निघाला. मात्र, 200 मीटर अंतरावर गेल्यानंतर त्याने शेताकडे नजर मारली असताना त्याला त्याची पत्नी दोन मुलांना घेऊन विहिरीकडे येताना दिसली. त्याला वाटले, पत्नीला देखील घरी यायचे आहे, म्हणून तो तिची वाट पाहत उभा राहिला. नंतर झाडाआड ते दिसले नाहीत. पत्नी अजून कसे येत नाही, म्हणून बघायला गेले असता, त्याला तिघे विहिरीत पडलेले दिसले. तेथेच त्याने आक्रोश सुरू केला.