जळगाव -कोरोनाच्या सावटाखाली जिल्ह्यातील चाळीसगाव येथील एका तरुणाने अवघ्या 5 जणांच्या उपस्थितीत आपला विवाह उरकला. त्याचप्रमाणे विवाहाचा अनावश्यक खर्च टाळून 25 हजार रुपयांचा धनादेश कोरोनाच्या लढ्यासाठी योगदान म्हणून मुख्यमंत्री साहय्यता निधीसाठी दिला आहे. युवराज भीमराव जाधव आणि वैशाली साथदिवे अशी समाजभान जपणाऱ्या वधू-वरांची नावे आहेत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह करणाऱ्या वधू-वरांनी सामाजिक भान तर ठेवले. शिवाय मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करत सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून लॉकडाऊनसह विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. एवढेच नाही तर विविध धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, क्रीडा स्पर्धा देखील रद्द करण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वीच युवराज जाधव यांचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथील वैशाली साथदिवे हिच्याशी निश्चित झाला होता. मात्र, कोरोनामुळे थाटामाटात विवाह करणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत विवाह समारंभ पुढे ढकलणे किंवा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह उरकणे असे दोनच पर्याय त्यांच्यासमोर होते. त्यामुळे युवराज यांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर विवाहाचा अनावश्यक खर्च टाळून 25 हजार रुपये मुख्यमंत्री साहय्यता निधीला देण्याचे ठरवले.