जळगाव - शहरासह जिल्ह्यात मराठी नववर्षाचे हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले. विविध सामाजिक संघटनांनी भव्य शोभायात्रा काढून आनंदोत्सव साजरा केला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जळगावात हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सकाळी शोभयात्रा काढण्यात आल्या. शोभायात्रांमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एकमेकांना गुढीपाडव्याच्या तसेच मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या जात होत्या. आबालवृद्धांचा सहभाग हे शोभायात्रांचे वैशिष्ट्य ठरले. सर्वत्र चैतन्याचे वातावरण होते. जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानातही मराठी नववर्षाच्या निमित्ताने महापूजा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.