महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव गेले खड्ड्यात, शेजारच्या जिल्ह्यांतून येणाऱ्या सर्वच रस्त्यांची दुरवस्था

शेजारच्या जिल्ह्यांमधून जळगावात येणाऱ्या सर्वच रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने जळगाव शहर खड्ड्यात गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

By

Published : Nov 7, 2019, 9:57 AM IST

Updated : Nov 7, 2019, 12:32 PM IST

खड्डेमय रस्ते

जळगाव- शेजारच्या जिल्ह्यांमधून जळगावात येणाऱ्या सर्वच रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने जळगाव शहर खड्ड्यात गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खड्डेमय झालेल्या महामार्गांवरून तारेवरची कसरत करत शहरात आल्यानंतर शहरातील रस्तेदेखील खराब असल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ओबडधोबड झालेल्या रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.

बोलताना चालक


जळगाव शहराला शेजारील धुळे, बुलढाणा आणि इतर जिल्ह्यांशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 तसेच जळगाव ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालवणे तर सोडाच त्यावरून पायी चालणे देखील शक्य होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाची अवस्था देखील काहीशी अशीच आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दीड वर्षांपासून रखडले आहे. चौपदरीकरणासाठी दीडशे किलोमीटर अंतराचा हा महामार्ग खोदून ठेवला आहे. आता पावसामुळे येथे चिखल झाल्याने त्यात अवजड वाहने फसण्याचे तसेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जीवघेण्या वाहतुकीमुळे अनेकांना प्राणाला मुकावे लागत आहे. तर अनेक जण अपघातांमुळे जायबंदी झाले आहेत. खराब रस्त्यांमुळे वाहनांचे देखील नुकसान होत आहे. दुसरीकडे, जिकिरीच्या प्रवासामुळे नागरिकांचा पैसा आणि वेळही वाया जात आहे.

रस्त्यांच्या दुरवस्थेचा सर्वाधिक त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना पाठीचे दुखणे, मणक्यांमध्ये गॅप असे आजार जडत आहेत. तर दुचाकी चालवणाऱ्या नागरिकांना रस्त्यांवरील धुळीमुळे श्वसनाचे विकार होत आहेत. ओबडधोबड रस्त्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. अवजड वाहनांचे टायर फुटत आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरून जळगाव ते धुळे या 2 तासांच्या 100 किलोमीटर अंतरासाठी 5 ते 6 तास वेळ लागत आहे. त्याचप्रमाणे जळगाव ते औरंगाबाद या रस्त्याची अवस्था तर खूपच बिकट आहे. या मार्गावरून एस. टी. महामंडळाने तसेच खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी वाहतूक बंद केली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या इतर जिल्ह्यांतर्गत रस्त्यांची देखील दुर्दशा झाली आहे. सर्वच रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करणे अपेक्षित असताना सरकारचे या कामांकडे दुर्लक्ष का होतेय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाली तर नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. मात्र, सरकारला जाग कधी येईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 झाला धोकादायक
जळगाव शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 खूपच धोकादायक झाला आहे. या महामार्गाचे धुळे जिल्ह्यातील फागणे ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीपर्यंतचे चौपदरीकरणाचे काम 7 वर्षांपासून प्रस्तावित आहे. या महामार्गाचे काम रखडल्याने शेकडो निरपराध नागरिकांना रस्त्यावरील जीवघेण्या वाहतुकीमुळे प्राणाला मुकावे लागले आहे. फागणे ते तरसोद तसेच तरसोद ते चिखली या दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या महामार्गाच्या १५० किलोमीटरच्या कामासाठी केंद्र सरकारने २ हजार ६९ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. या रस्त्यासाठी ९० टक्के भूसंपादनाचा प्रश्न मिटला आहे. आता तिसऱ्यांदा रस्त्याचे कंत्राट देण्यात आले आहे. तरीही सध्या फागणे ते तरसोद रस्त्याचे काम रखडले आहे. फागणे तरसोद कॉरिडॉर प्रायव्हेट लिमिटेड नावाने अॅग्रो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड आणि एमबीएल कंपनीने जॉईंट व्हेंचरने या महामार्गाच्या कामाचे कंत्राट घेतले आहे. सुरुवातीला वेगाने सुरु असलेले या रस्त्याचे काम आता मात्र रखडले आहे. जळगावातील तरसोद ते धुळे जिल्ह्यातील फागणे या ८७.३ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी केंद्र सरकारच्या मदतीने १ हजार २१ कोटी रुपये रक्कम मंजूर झाली. या रस्त्याला मुकटी, पारोळा, जळगाव येथे बायपास रस्ते असून पारोळा शहराबाहेर एक टोल प्लाझा प्रस्तावित आहे. तसेच एकूण ३३ किलोमीटरचे सर्व्हिस रस्ते आहेत. हे सगळे काम झाले तर पश्चिम विदर्भ तसेच खान्देशवासीयांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

Last Updated : Nov 7, 2019, 12:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details