जळगाव - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने कापसाच्या बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. चीनसोबत सध्या राजकीय संबंध बिघडल्याने, त्याचप्रमाणे कोरोनामुळे भारतातील कापूस बाजार अस्थिर झाला आहे. चीन हा भारताकडून कापूस घेणारा प्रमुख देश आहे. मात्र, चीनसोबतच वितुष्ट वाढल्याने दोन्ही देशांमध्ये होणारा सर्वच व्यापार थांबला आहे. चीनला निर्यात होणाऱ्या 15 लाख गाठींपैकी 10 लाख गाठी पडून आहेत. त्यामुळे निर्यातदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. कापसापासून तयार होणाऱ्या सुताचीही निर्यात थांबल्याने अनेक सौदे रद्द झाले आहेत.
चीनसोबत निर्यात थांबल्याने जळगावमधील अनेक निर्यातदारांकडे कापूस शिल्लक.. कोरोनामुळे सर्वच प्रकारचे व्यवसाय, उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे. कापूस क्षेत्रावर देखील मोठा परिणाम झाला आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यापासून कापसाच्या हंगामाला सुरुवात होत असते. मात्र, यावर्षी जानेवारी महिन्यात चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आयात-निर्यातीवर चीनने निर्बंध घातले. कापूस बाजारात चीन हा भारताचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. सद्य स्थितीत चीन आणि भारताचे राजकीय संबंध बिघडल्याने व्यापारावर परिणाम झाला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये दोन वर्षांपासून सुरु असलेल्या व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला जास्त किंमत नाही.
हेही वाचा -चिनी वस्तूंवरील अघोषित बंदीमुळे वस्त्र उद्योगातील छोटे व्यापारी, लघुउद्योजक धास्तावले
दोन वर्षांपासून भारताच्या कापसाचे दर देखील कमी होत आहेत. अनेक स्पिनींग आणि टेक्सटाईल्स मील व्यावसायिकांकडे गेल्या वर्षाचा माल शिल्लक होता. त्यातच पुन्हा आता चीनमधील निर्यात थांबल्याने भारतीय बाजारात मुबलक कापूस आहे. कोरोनामुळे देशात चार महिन्यांपासून लॉकडाऊन झाल्यामुळे देशभरातील टेक्सटाईल्स मील ६० ते ७० टक्के क्षमतेवर सुरु आहेत. त्यातच पुन्हा सहा महिन्यानंतर कापसाचा नवीन हंगाम सुरु झाल्यानंतर कापसाची आवक पुन्हा वाढणार आहे. त्यामुळे स्पिनींग व टेक्सटाईल्स मीलवर परिणाम होणार आहे.
कापूस निर्यातीसाठी पर्याय शोधण्याची गरज...
चीनने निर्यात थांबवल्यामुळे देशातील निर्यातदारांच्या १० लाख गाठी पडून आहेत. आता या 10 लाख गाठी चीन व्यतिरिक्त इतर देशांना पाठवण्याबाबत निर्यातदारांमध्ये बैठका सुरु आहेत. चीनमध्ये नेहमीच निर्यातीबाबत अडचणी येत आहेत. कोरोना, व्यापार युद्ध आणि राजकीय संबंध बिघडल्याने भारतासमोर अनेक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे कापसासाठी अन्य निर्यातदार देश शोधण्याचा पर्याय सुरु आहे.
सरकारनेही याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे, अशी माहिती खान्देश जिनींग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली. तर कोरोना व अन्य कारणांमुळे चीनला होणारी कापसाची निर्यात थांबली आहे. कापूस बाजारात अनेक अडचणी आहे. कापसापेक्षा अधिक फटका सुतच्या निर्यातीला बसला आहे. कापूस बाजारात मंदी असल्याने जिनिंग उद्योग संकटात सापडला आहे, असे जिनिंग उद्योजक लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.