जळगाव -ख्रिस्ती बांधवांचा पवित्र नाताळ सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. नाताळसाठी जळगाव शहरातील चर्च सजले असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. यावर्षी नाताळ सणावर कोरोनाचे सावट असल्याने नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. नाताळ सणानिमित्त ख्रिस्ती बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा -जळगाव : १६ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळेल कोरोनाची लस; पहिल्या टप्प्याचे नियोजन सुरू
अंगावर लाल कपडे, डोक्यावर पांढरे केस आणि पांढरी दाढी असलेल्या नाताळबाबाच्या स्वागतासाठी बच्चेकंपनीची तयारी सुरू आहे. शहरातील तीनही चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन पूर्ण झाले आहे. प्रत्येक चर्चवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बाळ प्रभू येशूच्या जन्माच्या स्वागतासाठी आकर्षक असे देखावे पण साकारण्यात आले आहेत. ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज अगदी सुंदर पद्धतीने सजवले आहेत. तर, दुसरीकडे नाताळच्या उत्सवासाठी बाजारपेठेतही चैतन्य आहे. मात्र, यंदा नाताळवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे, खबरदारी म्हणून चर्चमध्ये एकाच वेळी होणारी उपासना कमी लोकांच्या उपस्थितीत ३ ते ४ वेळेस घेण्यात येणार आहे. उपासनेसाठी येताना स्वतःचेच बायबल आणावे, गर्दी करू नये, अशा सूचना चर्चतर्फे देण्यात आल्या आहेत.