जळगाव -जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या शेंगोळा गावात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मांत्रिकाने शारीरिक व्याधीने ग्रस्त असलेल्या 22 वर्षीय मुलीवर अघोरी उपचार केले आहेत. अंगात चुडेल घुसली असून, तिला बाहेर काढण्याच्या नावाखाली तोंडात चप्पल धरायला लावून मुलीला गावभर फिरवले आहे. या प्रकाराची कुणकुण लागताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी धाव घेत संबंधित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे समुपदेशन करत मुलीवर वैद्यकीय उपचार करण्यास राजी केले.
शेंगोळा येथील एका कुटुंबातील मुलगी अनेक दिवसांपासून शारीरिक व्याधीने ग्रस्त होती. पालकांनी तिच्यावर अनेक औषध उपचार केले. पण गुण येत नव्हता. मुलीला बाहेरची बाधा असल्याचा चुकीचा सल्ला नजीकच्या नातेवाईकांनी मुलीच्या परिवाराला दिला. त्यानुसार मुलीच्या वडिलांनी यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील एका मांत्रिकास बोलावले. त्या मांत्रिकाने मुलीवर अघोरी उपचार केले. मुलीला तोंडात पायातील चप्पल धरायला लावून गावातून व गावाच्या आजूबाजूच्या परिसरात फिरवले. अशा प्रकारे मुलीला हीन वागणूक देवून मुलीवर अघोरी उपचार करण्यात आले. मांत्रिकाने मुलीच्या अंगातील 6 पैकी 4 चुडेल काढून मुलीच्या परिवाराकडून काही रक्कमही उकळली आहे.