जळगाव -तीन अज्ञात व्यक्तींनी एका 50 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यावर लोखंडी पाईपने वार करत त्याची निर्घृणपणे हत्या केली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरातील ख्वाजा नगरात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
रईस दिलदार चौधरी उर्फ रईस दंगा (वय 50 वर्षे, रा. सावदा), असे मयताचे नाव आहे. शहरातील मरिमाता मंदिर परिसरातील मागील बाजूस असलेल्या ख्वाजा नगरच्या गेटसमोर ही घटना घडली. रईस दंगा हे येथील एका किराणा दुकानाजवळील बखळ जागेत बसलेले होते. तीन संशयितांनी त्यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने वार केले. त्यात डोक्याला गंभीर इजा झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यात दंगा यांचा जागीच मृत्यू झाला. दंगा यांच्या हत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचे समोर आले आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.