जळगाव - पोलीस कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या मतभेदावरून एका माथेफिरुने पेट्रोल टाकून चक्क पोलीस दूरक्षेत्राची चौकी जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे ही घटना घडली असून पोलीस चौकीतील साहित्य जळून खाक झाले आहे. हा माथेफिरू गावात सट्टा, मटका व्यवसायासाठी पोलिसांकडे परवानगी मागत होता, असे सांगितले जात आहे.
जळगावच्या शेंदुर्णीत माथेफिरुने जाळली पोलीस चौकी हेही वाचा -'अभाविप' आणि 'राष्ट्रीय सुरक्षा मंच'तर्फे #CAA कायद्याच्या समर्थनार्थ जळगावात भव्य मोर्चा
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस दलाच्यावतीने जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे पहूर पोलीस ठाण्याअंतर्गत दूरक्षेत्र चौकी उभारण्यात आली आहे. ही चौकी आज (शनिवारी) दुपारी 2 वाजताच्या सुमारास पेट्रोल टाकून पेटवून दिली. त्यात चौकीतील टेबल, खुर्च्या, महत्त्वाची कागदपत्रे तसेच वायरलेस सेट, सीसीटीव्ही जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेवेळी एकही पोलीस कर्मचारी चौकीत उपस्थित नव्हता. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या घटनेनंतर काही तरुणांनी धाव घेत चौकीला लागलेली आग विझवली.
हेही वाचा -एसटी महामंडळाच्या कारभाराविरुद्ध विद्यार्थी आक्रमक; जळगाव आगारात रोखल्या बसेस
दरम्यान, समाधान नामक तरुणाने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. घटनेनंतर तो फरार झाला आहे. गावात सट्टा, मटका व्यवसायासाठी परवानगी द्यावी, म्हणून तो पोलिसांना सांगत होता. पोलिसांनी त्याला नकार दिल्याने त्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याची चर्चा गावात सुरू आहे.