जळगाव- बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. जळगाव शहर व शनिपेठ पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. विलास मुधकर लोट (वय ४०) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून तो बळीराम पेठेतील रहिवासी आहे.
बेकायदेशीरपणे पिस्तूल, तसेच शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील बळीराम पेठ भागात राहणारा संशयित आरोपी विलास लोट याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना मिळाली होती. त्यानुसार डॉ. रोहन यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांना कारवाईचे निर्देश दिले होते. सायंकाळी शहर व शनिपेठ पोलिसांनी संशयित आरोपी विलासच्या बळीराम पेठेतील घराची झडती घेतली. त्यात पोलिसांना ५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल, १ हजार ५०० रुपये किंमतीचे ३ जिवंत काडतुसे, ५०० रुपये किंमतीचा कोयता, आणि प्रत्येकी १ हजार रुपये किंमतीच्या दोन गुप्त्या असा शस्त्रसाठा आढळून आला.