जळगाव -राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण आता खऱ्या अर्थाने ढवळून निघणार आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, गावागावातील एकोपा टिकून रहावा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीचा खर्च टाळून ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने जिल्ह्यातील पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी एका अभिनव उपक्रमाची घोषणा केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावाच्या विकासासाठी 21 लाखांचा निधी मिळवा, असे बक्षीसच त्यांनी जाहीर केले आहे. आमदार पाटील यांच्या संकल्पनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या व नव्याने स्थापित अशा महाराष्ट्रातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील 750 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. राज्यासह संपूर्ण विश्वात थैमान घातलेल्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव अजून थांबलेला नाही. कोरोनाच्या भयावह परिस्थितीत गेल्या मार्च महिन्यापासून राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करून परिस्थिती योग्य प्रकारे हाताळत आहे. कोरोनाच्या अशा भयावह परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग, निवडणुकीत होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च, प्रशासनावर येणारा ताण, विशेष म्हणजे, गावागावात उद्भवणारे वाद हे सर्व लक्षात घेऊन ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध केल्या पाहिजेत, याच विचारातून आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील गावांसाठी ही संकल्पना जाहीर केली.
या कारणांसाठी केली उपक्रमाची घोषणा-
निवडणूक काळात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये. गावागावातील एकोपा टिकून रहावा, कोरोनाचे संकट बळावू नये, कोरोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावर ताण येऊ नये, निवडणूक खर्चाची बचत व्हावी, यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील मुदत संपलेल्या व नव्याने स्थापित निवडणुकीसाठी पात्र असलेल्या ग्रामपंचायतींनी निवडणूक न होऊ देता बिनविरोध निवडणूक पार पाडावी, असे आवाहन केले. निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतींना गावाच्या विकासासाठी 21 लाख रुपयांचा निधी ते स्थानिक आमदार विकास निधीतून उपलब्ध करून देणार आहेत.