जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पाटील यांचा ताफा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अडवला. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील गांधी चौकात हा प्रकार घडला.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी याबाबत माहिती देताना. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीसह अन्य 10 संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांचा ताफा रस्त्यातच अडवून त्यांना निवेदन दिले.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जगन सोनवणे, नगरसेविका पुष्पा सोनवणे यांच्यासह विविध 10 संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा ताफा अडवला. त्यानंतर जयंत पाटलांशी चर्चा करत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपत सुमारे 20 मिनिटे ताफा अडवून धरला होता. ऐनवेळी झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला केले. तेव्हा जयंत पाटील यांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला.
हेही वाचा -गोपीचंद पडळकरांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौफेर टिका
काय आहे प्रकरण?
जगन सोनवणे हे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी आहेत. 2019मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने भुसावळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी याठिकाणी अपक्ष उमेदवाराला पाठबळ दिल्याचा आरोप जगन सोनवणे यांनी केला आहे. माजी आमदार चौधरी यांनी वेळोवेळी स्वार्थासाठी पक्ष बदल केला आहे. ते पक्षाशी एकनिष्ठ नाहीत, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी भूमिका जगन सोनवणे यांनी घेत जयंत पाटील यांचा ताफा अडवला. पक्ष माजी आमदार चौधरी यांच्यावर कारवाई करणार का? यासाठी आपण 'सवाल मोर्चा' काढत मंत्री जयंत पाटील यांचा ताफा अडवल्याचे जगन सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.