महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाची चाचणी आता जळगावातही होणार; अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापन्यास शासनाची मान्यता - green signal for covid 19 test in Jalgaon,

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड-19 विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे. या विषयासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती.

covid 19 test in Jalgaon,
कोरोनाची चाचणी आता जळगावातही होणार

By

Published : Apr 16, 2020, 4:51 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी यापूर्वी पुणे, औरंगाबाद, धुळे येथे पाठवावे लागत होते. त्यातच जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. ही परि‍स्थिती लक्षात घेऊन 7 एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील रुग्णांची तातडीने तपासणी होण्यासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी लॅबची मागणी केली होती.

कोरोनाची चाचणी आता जळगावातही होणार

पालकमंत्र्यांची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेचच तत्त्वत: मान्य केली होती व लवकरात लवकर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय महाविद्यालयाने परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन तो शासनास सादर केला होता. त्यानुसार शासनाने हा प्रस्ताव मान्य केला असून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे कार्यासन अधिकारी अ. मु. डहाळे यांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक यांना पत्राद्वारे कळविले आहे की, या विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यातील 6 शासकीय रुग्णालयांमध्ये विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा स्थापित करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. यामध्ये जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह बारामती, कोल्हापूर, गोंदिया, नांदेड आणि आंबेजोगाई (जि. बीड) येथे आता कोविड-19 तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) स्थापन करण्यास मान्यता प्रदान केली आहे.

कोरोना चाचणीसाठी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. यासाठी संस्थेस राज्य योजनेतंर्गत जिल्हा वार्षिक योजना, स्वीय प्रपंची खाते व महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतून करावा, असे म्हटले आहे. त्याचबरोबर या प्रयोगशाळेसाठी लागणारी आवश्यक सामग्री ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात आलेल्या समितीच्या मान्यतेने व शिफारशीनुसार करण्यात यावी, असेही म्हटले आहे. कोरोना चाचणीची सुविधा जळगावात उपलब्ध झाल्यामुळे आता जिल्ह्यातील संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी धुळे, औरंगाबाद येथे न पाठविता जिल्ह्यातच रुग्णांचे निदान करता येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details