जळगाव -राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या दीड ते दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी प्रमुख असलेला 'जळगाव शहर मतदारसंघ' यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
जळगाव शहर मतदारसंघांचा पूर्वेतिहास..
२०१४ पूर्वी जळगाव शहर मतदारसंघाचे नाव घेतले तर माजी मंत्री सुरेश जैन यांचे नाव डोळ्यासमोर येत होते. कारण या मतदारसंघातून जैन तब्बल नऊ वेळा निवडणूक आले होते. मात्र, २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांनी दहाव्यांदा आमदारकीचा विक्रम करण्याच्या उद्देशाने रिंगणात उतरलेले शिवसेनेचे सुरेश जैन यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत युती तुटल्याने भाजप आणि सेना स्वतंत्र लढले होते. सुरेश जैन यांचा अनपेक्षितपणे पराभव करत भाजपने जळगाव शहर मतदारसंघात आपले पाय रोवले होते. त्यानंतर झालेली महापालिका निवडणूक देखील दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. विधानसभा निवडणुकीपाठोपाठ महापालिकेतही भाजपने एकहाती सत्ता स्थापन करत जळगाव शहरात आपला बालेकिल्ला भक्कम केला होता.
हेही वाचा... जळगाव महापालिकेच्या महासभेत स्वच्छतेच्या विषयावरून भाजप-सेना आमने सामने
मात्र, यावेळी युतीच्या तहामुळे भाजपला राजकीय आखाड्यात हा बालेकिल्ला आता किल्लेदारासह सेनेला सोडण्याची वेळ येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण युतीच्या फॉर्म्युल्यात ही जागा सेनेच्या वाट्याला आहे. युतीधर्म पाळताना शिवसेनेच्या आग्रहामुळे हा मूळ मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागू शकतो आहे. त्यामुळे राजकीय ताकद असूनही भाजपला या मतदारसंघावर पाणी सोडावे लागते की काय ? या भीतीमुळे भाजप कार्यकर्ते नाराज होते. परंतु, महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान आमदार सुरेश भोळेंच्या नावे जनादेश मागितला. त्यामुळे ही जागा भाजपच लढवणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत मिळाले असून भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे दुणावला आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेमुळे सेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. हक्काच्या जागेवर पाणी कसे सोडायचे? असा प्रश्न सेनेच्या इच्छुकांसह कार्यकर्त्यांना पडला आहे.
हेही वाचा... बहुजन समाजाच्या नेत्यांचा भाजपकडून फक्त वापर; माजी आमदार शिरीष चौधरींचे टीकास्त्र
जळगाव शहर मतदारसंघाची सद्यस्थिती...
विरोधी पक्ष प्रभावहीन
जळगाव शहर मतदारसंघात सद्यस्थितीत भाजप खालोखाल सेनेची ताकद अधिक आहे. विद्यमान आमदार सुरेश भोळे भाजपचे प्रतिनिधित्व करतात. या शिवाय महापालिकेत ५७ नगरसेवक देखील भाजपचेच आहेत तर १५ नगरसेवकांसह शिवसेनेचीही ताकद बऱ्यापैकी आहे. मात्र, विरोधीपक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष प्रभावहीन आहेत. विधानसभा निवडणुकीत समोर कोणत्याही पक्षाचा उमेदवार असला तरी याठिकाणी युतीचाच उमेदवार मैदान मारेल, याचीच शक्यता अधिक आहे. युतीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. युतीच्या विरोधात रिंगणात उतरणाऱ्या आघाडीच्या फॉर्म्युल्यात ही जागा काँग्रेसकडे आहे. मात्र, विरोधी पक्षांकडे अजूनही सक्षम उमेदवार नाही. काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांचे नाव आघाडीकडून इच्छुक असलेल्यांमध्ये अग्रस्थानी आहे. 'जळगाव फर्स्ट'च्या माध्यमातून ते कामाला देखील लागले आहेत.
हेही वाचा... लोकसभेच्या यशामुळे विधानसभेला गाफिल राहू नका; जळगावात भाजप नेत्यांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान
या प्रश्नांभोवती फिरते मतदारसंघाचे राजकारण...
जळगाव शहर मतदारसंघाचे राजकारण हे प्रामुख्याने मूलभूत सुविधांच्या अवतीभोवती फिरते, असा आजवरचा अनुभव आहे. शहराचा रखडलेला विकास, अंतर्गत रस्ते, समांतर रस्ते, उड्डाणपूल, महापालिकेवरील कर्ज, गाळेधारकांचा प्रश्न याच मुद्यांभोवती आताची निवडणूक अवलंबून असणार आहे. शहरातील विविध व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळ्यांचा विषय हा प्रमुख राजकीय मुद्दा बनवला जाऊ शकतो. ५७ नगरसेवक असलेल्या भाजपकडून गेल्या वर्षभरात तब्बल एक हजार कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी आणल्याचा दावा केला जात आहे. पाणीपुरवठ्यासाठी अमृत योजना, सांडपाणी व्यवस्थापनासाठी भुयारी गटार योजना, विविध उड्डाणपूलांची उभारणी अशा कामांना सुरुवात झाली असून वर्षभरात जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेवरील हुडको व जिल्हा बँकेचे कर्ज फेडीचा मुद्दाही भाजप प्रचारात आणेल, यात शंका नाही. दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून गेल्या ३५ वर्षात शहराची झालेली पिछेहाट, हा मुद्दा शस्त्र म्हणून युतीच्या विरोधात वापरला जाऊ शकतो. पण त्याला कितपत समर्थन मिळेल, हे सांगणे कठीण आहे.
हेही वाचा... जळगाव महापालिका : वर्षपूर्ती होऊनही भाजपला सूर गवसेना; विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेकडून कोंडी सुरूच